भंडारा : जातीच्या गणितांवर निवडणूक होऊ नये, असे कितीही म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत ‘जातकारण’ येतेच. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही आता ‘जातकारण’तापले आहे. तेली आणि पोवार समाजाच्या नेत्यांनी या मतदारसंघात आता पक्षाचा नाही तर जातीचा उमेदवार हवा, अशी मागणी केली आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली आणि अनुसूचित जातीचा प्रभाव आहे. येथे विकासाच्या नव्हे तर जातीच्या आधारावर निवडणुकांची समीकरणे ठरतात. त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी या मतदारसंघात उमेदवार देताना जातीचे प्राबल्य आणि समाजाचा कल पाहूनच उमेदवार देतात. आता तेली आणि पोवार समाजाच्या नेत्यांनी आणि मतदारांनी ‘पक्षाच्या नाही तर आमच्या समाजाच्या किंवा जातीच्या उमेदवारालाच निवडून देऊ,’ असा पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी गोंदियात पोवार समाजाने मोर्चा काढून निर्वाणीचा इशारा दिला, तर भंडाऱ्यातील तेली समाजाच्या मेळाव्यात, ‘तेली उमेदवार दिला नाही तर राजकीय पक्षाचे काही खरे नाही,’ असा सूर समाजातील सर्व नेत्यांनी आळवला. त्यामुळे आता महायुती आणि आघाडीतील पक्षश्रेष्ठी उमेदवार जाहीर करताना कोणत्या समाजाकडे झुकते माप देईल आणि कोणत्या जातीच्या दबावाला बळी पडेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – रायगडच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटात वाद ?

हेही वाचा – वंचितबाबत संभ्रम वाढला

मागील काही काळापासून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात तेली विरुद्ध कुणबी, असे राजकारण पहावयास मिळत आहे. समाजाच्या व्यक्तीला तिकीट न देता सतत डावलण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्यात आल्याची सल तेली समाज बोलून दाखवत आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने तेली समाजाच्या व्यक्तीला तिकीट नाकारले. यामुळे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.
२०२४ मध्ये भंडारा जिल्ह्यातील भंडारा-पवनी, साकोली-लाखांदूर-लाखनी आणि तुमसर-मोहाडी, अशा तीन विधानसभा मतदारसंघात एकूण ९ लाख ९२ हजार १२० मतदार असून गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा-गोरेगाव, सडक अर्जुनी-अर्जुनी मोरगाव या विधानसभा क्षेत्रात ८ लाख २४ हजार ४८७ अशी मतदारांची संख्या आहे. जातीय आधारावर विभागणी केली तर सध्या भंडारा गोंदियात सव्वाचार लाख कुणबी मतदार असल्याचे सांगितले जाते. तीन ते साडेतीन लाख पोवार तर तीन लाखाच्या घरात तेली मतदार असल्याचा दावा केला जातो. उर्वरित इतर व अनुसूचित जातीचे मतदार असल्याचे सांगितले जाते. या आकडेवारीनुसार जातीय गणिते जुळवून आता पक्षांना उमेदवाराची निवड करावी लागणार आहे. भाजप बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाच्या उमेदवारालाच प्राधान्य देईल, असे निश्चित मानले जात आहे. त्यातही ‘बाहेरचे नकोच’ असा सूर जिल्ह्यातील मतदारांतून निघत असल्याने स्थानिक कुणबी उमेदवाराला उमेदवारी दिल्यास भाजपला फायदा होईल, असे विश्लेषकांचे मत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara gondia lok sabha constituency caste cause heated up in bhandara gondia print politics news ssb