भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ २९ नोव्हेंबर रोजी भंडारा डेपोच्या शिवशाही बसला भीषण अपघात घडला होता. या अपघातात तब्बल ११ जणांनी नाहक प्राण गमावले. या प्रकरणी एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय अधिकाऱ्यांनी चालकाला निलंबित केले असून या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भंडारा इथून गोंदियाकडे प्रवासी घेऊन निघालेली शिवशाही बस सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ उलटली. भरधाव वेगाने बस चालविणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला होता. या अपघातात ११ निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय अधिकाऱ्यांनी शिवशाही बस चालक प्रणय रायपूरकर याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
हेही वाचा : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी, मंत्र्यांना बंगले; कर्मचारी एका खोलीत चार !
भंडारा-गोंदिया विभाग नियंत्रक तनुजा काळमेघ यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, चालक प्रणय रायपूरकर याच्या निलंबनाचा आदेश ३० नोव्हेंबर रोजी काढला असून सध्या तो डुग्गीपार पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील आदेशाप्रमाणे हे निलंबन राहणार असून या कालावधीत सदर चालक निलंबीत कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रावर दररोज स्वाक्षरी करणे त्याला बंधनकारक राहणार आहे.
या अपघातास कारणीभूत ठरलेला चालक रायपूरकर याच्या हाताने यापूर्वी पाच किरकोळ अपघात झाले आहेत. त्यानंतर या चालकाला पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले होते. अशी माहिती विभाग नियंत्रक काळमेघ यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. मात्र पाचवेळा एखाद्या चालकाकडून अपघात झाल्यानंतर त्याच्यावर एसटीच्या विभागस्तरावरून काय कारवाई झाली, त्याच चालकाला पुन्हा शिवशाही चालवण्याची परवानगी का देण्यात आली, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. सध्या मृतांचा आकडा ११ वर असला तरी अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व येणार असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा : मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळ्याआधी नागपूरमध्ये चेहरा नसलेल्या नेत्याचे बॅनर्स, काय आहे संकेत?
प्रणय रायपूरकर याच्या आजवरच्या सेवा काळाची पार्श्वभूमी अपघाताच्या घटनांची असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाला, असे बोलले जात आहे. दरम्यान, वेळ काढून नेण्यासाठी आजही प्रशिक्षण न घेतलेल्या काही चालकांच्या हाती देखील शिवशाही दिली जात असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. विभाग नियंत्रक काळमेघ यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे.
प्रशिक्षण नसलेलेही चालवतात शिवशाही…
भंडारा – गोंदिया – नागपूर हे अत्यंत महत्त्वाचे मार्ग आहेत. या मार्गावर प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. असे असताना एसटीच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
खासदारांची आकस्मिक पाहणी…
या अपघातानंतर खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी भंडारा परिवहन मंडळाला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. त्यांनी बस डेपो, बसस्थानक आणि कार्यशाळेला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या अनेक उणिवा आणि निष्काळजीपणा लक्षात आला. खासदार डॉ. पडोळे यांनी परिवहन मंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बस डेपो आणि आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असल्याचे दिसून आले. निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे डॉ.पडोळे यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील, असे आवाहन त्यांनी परिवहन मंडळाला केले.