भंडारा : एकीकडे शासनाकडून लाडकी बहीण योजना राबवून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे मात्र लाडक्या बहिणींना सुरक्षित वातावरण देण्यास शासन असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी एका प्राचार्याने विद्यार्थिनींकडे चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका विद्यालयात उघडकीस आला आहे.

विद्यार्थिनींनी आक्रमक भूमिका घेत पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना विद्यालयात बोलावून घेतले आणि सर्वांसमक्ष प्राचार्याने केलेल्या गैरकृत्याचा भंडाफोड केला. त्यानंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राचार्याला चांगलेच चोपले. पोलिसांनी वेळेत पोहोचून प्राचार्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या, परिवहन मंत्र्यांच्या घोषणेवर संघटना म्हणते…

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात एएनएम आणि जीएनएमच्या २०० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यालयाचे प्राचार्य किरण एस. मुरकुट हे वर्षभरापूर्वी विद्यालयात रुजू झाले. मागील काही महिन्यांपासून एएनएमच्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थिनींना प्राचार्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत होती. प्राचार्य त्यांच्यासोबत गैरवर्तन करीत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. एएनएमच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी मागील वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची परीक्षा ५ व ६ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी प्राचार्य मुरकुट यांनी रात्री दोन विद्यार्थिनींना व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर कसे गेले? याबाबत विचारणा केली. त्यावर विद्यार्थिनींनी ‘पेपर चांगले गेले मात्र निकालाची भीती वाटत असल्याचे’ प्राचार्यांना सांगितले. त्यावर प्राचार्यांनी ‘तुम्ही माझी मर्जी राखणार असाल तर मी तुम्हाला पास होण्यासाठी मदत करु शकतो’ असे सांगितले आणि ताबडतोब मॅसेज डिलिट केले. मात्र त्याचवेळी विद्यार्थिनींनी या मॅसेजेसचे स्क्रिनशॉट काढून पालकांना याबाबत माहिती दिली. हा संतापजनक प्रकार कळताच पालकांनी प्राचार्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

२६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान पीडित विद्यार्थिनी, संतप्त पालक, सामाजिक कार्यकर्ते प्राचार्याच्या कक्षात धडकून विचारणा केली असता प्राचार्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आधीच संतप्त पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राचार्याला बेदम चोप दिला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अन्यायग्रस्त विद्यार्थिनींनी सांगितले की, प्राचार्याकडून त्यांना वारंवार अशाप्रकारे लज्जास्पद वागणूक दिली जात होती. विद्यार्थिनींचे संपर्क क्रमांक मागायचे, मात्र आम्ही त्यांना कधीही इतर मुलींचे संपर्क क्रमांक दिले नाही. या विद्यार्थिनींना त्यांच्याच सोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने प्राचार्य सांगतात त्या प्रमाणे वागले तर आपल्याला काहीही होणार नाही, असे बोलून धमकावत असल्याचेही यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी या विद्यालयातील विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकारही दडपण्यात आला होता.

यावेळी जिल्हा रुग्णालयाचे अनेक अधिकारी व शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे, बाळू ठवकर, उमेश मोहतुरे, विनीत देशपांडे, सतीश सार्वे, विकास मदनकर, अजय मेश्राम, पवन वंजारी, अजित बन्सोड, राधेय भोंगाडे, आकाश ठवकर, रुपेश मारवाडे, मयूर सुर्यवंशी, जयंत बोटकुले, अमोल लांजेवार, मनोज लुटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विद्यालय प्रशासनाला धारेवर धरले. प्राचार्यांच्या कक्षाला सील ठोकण्यात आले.

हेही वाचा – राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

विद्यार्थिनींवर मानसिक दबाव

एम्समध्ये कार्यरत असताना बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या कारणावरुन किरण मुरकुट यांना काही वर्षांपूर्वी बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती आहे. शिवाय भंडारा येथे रुजू झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थिनींवर मोठ्या प्रमाणात मानसिक दबाव आणण्याचा प्रकार सुरु असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. वसतिगृहात महिला वॉर्डन नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता विजय क्षिरसागर यांनी नुकतीच नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री, मुख्य सचिव व उपसंचालक यांच्याकडे लिखित स्वरुपात केली आहे.

सीसीटीव्ही कॅमरे व सुरक्षारक्षक नाहीत

परिचर्या प्रशिक्षण केंद्रात व परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसून सुरक्षारक्षक देखील नाहीत. विद्यार्थिनींचे वसतिगृह विद्यालयापासून १ किमी अंतरावर असल्यामुळे विद्यार्थिनींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Story img Loader