भंडारा : जिल्ह्यातील जवाहरनगर आयुध निर्माणीत झालेल्या भीषण स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. रात्री उशीरा बचावकार्य थांबविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुध निर्माणीच्या अतिसंवेदनशील ‘एलपीटीई सेक्टर’मध्ये सकाळी १०च्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. यामुळे जमिनीत मोठा खड्डा पडला आणि संपूर्ण इमारत एका क्षणात कोसळली. घटनेची माहिती मिळताच भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यासाठी ‘एसडीआरएफ’ तसेच नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. ढिगाऱ्याखाली आठ जणांचे मृतदेह आढळून आले. चंद्रशेखर गोस्वामी (५९), मनोज मेश्राम (५५), अजय नागदेवे (५१), अंकित बारई (२०), लक्ष्मण केलवडे (३८), अभिषेक चौरसिया (३५), धर्मा रंगारी (३५) आणि संजय कारेमोरे (३२) अशी त्यांची नावे आहेत. अंकित हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी काही महिन्यांपासून शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागला होता. त्याच्या मृत्यूमुळे साहुली गावावर शोककळा पसरली. दुर्घटनेत एन. पी. वंजारी, संजय राऊत, राजेश बडवाईक, सुनील कुमार यादव, जयदीप बनर्जी जखमी झाले आहेत.

स्फोटानंतर भोंगा वाजताच वसाहतीतील अनेकांनी घराबाहेर पळ काढला. स्फोटामुळे परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना भेगा पडल्या तर काही ठिकाणी लाद्यांचे तुकडे झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. परिसरातील १० गावांमध्ये स्फोटाचे हादरे जाणवले. घरांवरील सिमेंट पत्र्याचे तुकडे इतरत्र पडले. स्फोटाची माहिती मिळताच कामगारांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिसरात गोंधळाची स्थिती होती.

आयुध निर्माणीतील स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या सहवेदना, जखमी कर्मचारी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. बाधितांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

संरक्षण दलाबरोबरच जिल्हा प्रशासन मदतकार्यात सहभागी आहे. वैद्याकीय मदतीसाठीसुद्धा पथक सज्ज ठेवले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री