भंडारा : दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याप्रकरणी भंडाऱ्यात मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला अटक करण्यात आली. यात सहभागी असलेल्या आणि कारवाईच्या भीतीनं फरार झालेल्या एकाच्या शोधात भंडारा पोलिसांचं पथक गोंदियाकडं रवाना झालं आहे. हा प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर घडला. बारव्हा येथील महात्मा गांधी विद्यालयांचे मुख्याध्यापक विशाल फुले (४१) आणि सहायक शिक्षक दीपक मेश्राम (३५) असं पोलिसांनी अटक केलेल्यांची नावं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर, मयूर टेंभरे असं फरार असलेल्याचं नावं असून तो गोंदियाचा असल्याने भंडाऱ्याचा पोलीस पथक त्याला अटक करण्याकरिता रवाना करण्यात आलं आहे.अटकेची कारवाई करण्यात आलेले मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक हे दोघेही महात्मा गांधी विद्यालय बारव्हाचे आहेत. या शाळेला अगोदर दहावीचं परीक्षा केंद्र होतं. मात्र, शाळेजवळ बिअर बार असल्यानं या शाळेचे परीक्षा केंद्र रद्द करून चिचाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाला दहावीचे परीक्षा केंद्र देण्यात आले. हाच राग मनात धरून आकसापोटी मुख्याध्यापक विशाल फुले, सहाय्यक शिक्षक दीपक मेश्राम आणि मयूर टेंभरे यांनी दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका त्यांच्या व्हाट्सअप वर घेत ती समाज माध्यमावर व्हायरल केली होती.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापक विशाल फुले आणि सहायक शिक्षक दीपक मेश्राम यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घटनेची कबुली दिली. याप्रकरणी त्यांच्या विरोधात लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. तर, मयूर टेभरेच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या इतर निविर्दीष्ट परीक्षात होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९८२, सह कलम ३(५) भा न्या स २०२३, सह कलम ७२ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.