भंडारा : साकोली मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात लढत झाली. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत नाना पटोले यांनी ब्राह्मणकर यांचा अवघ्या २०४ मतांनी पराभव करून बाजी मारली. मात्र पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकरांचे “मतदारांच्या मनातील आमदार”, असा आशयाचे फलक साकोलीत झळकले आहे. त्याची या मतदार संघात जोरदार चर्चा रंगली आहे.
अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या साकोली विधानसभा निवडणुकीत ब्राह्मणकर आणि पटोले यांच्यात अटीतटीची लढत बघायला मिळाली. साकोली, लाखांदूर आणि लाखनी या तीन तालुक्यात मिळून मतदारसंघ निर्माण झाला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा भंडाऱ्यातील हा सर्वात मोठा मतदार संघ आहे. पटोले हे साकोलीतून आता पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उभे होते. यापूर्वी ते खासदारही राहिलेले आहेत. त्यांच्यासमोर महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर रिंगणात होते. त्यांनी उमेदवारी घोषित होण्याच्या एक दिवसापूर्वी भाजपात प्रवेश दिला. ईव्हीएम मतमोजणीत शेवटच्या फेरीत ब्राह्मणकर हे नाना पटोले यांच्यापेक्षा ६५८ मतांनी आघाडीवर होते. मात्र, पटोले यांनी पोस्टल मतांनी तारल्यानं ब्राह्मणकर यांचा अवघ्या २०८ मतांनी पराभव झाला. ब्राह्मणकर हे या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी, नाना पटोले यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला या निवडणुकीत सहज विजय मिळाला नाही.
हेही वाचा : शिवशाही बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती; चालकाने या पूर्वी ५ वेळा …
आता ब्राह्मणकर यांनी नाना पाटोले यांना ईव्हीएमच्या मतमोजणीत पराभूत केल्याने नागरिकांच्या मनात ब्राह्मणकर यांना वेगळे स्थान मिळाले आहे. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांनी “मतदारांच्या मनातील आमदार” अशा आशयाचे फलक साकोली विधानसभा क्षेत्रात लावले आहेत. ते सध्या भंडारा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.