भंडारा : स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष व आमदार राजू कारेमोरे यांचा उजवा हात म्हणून ओळख असलेल्या यासिन छवारे याने जीवे मारण्याची धमकी दिली. मेसेज आणि फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली असून या प्रकरणी धमकी देणाऱ्या विरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमसर शहरातील मोठा बाजार ते ठवरे पुतळ्यापर्यंत नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ६६ लाखांचा सिमेंट रस्ता बांधकाम नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण करण्यात आले, मात्र रस्ता एक महिन्यात उखडायला सुरुवात झाली असून रस्त्याच्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना डोळे बंद करावे लागतात. वृद्ध व मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांना श्वसनाचे आजार होण्याच्या धोका वाढला आहे. दत्तात्रय नगर येथील रहिवाशांनी नगरपालिका प्रशासनाकडे व शिवसेनेचे अमित मेश्राम यांच्याकडे निकृष्ट दर्जाचे बांधकाम कंत्राटदारांने केल्याची तक्रार दिनांक ११ डिसेंबर २०२४ बुधवार रोजी निवेदनाद्वारे केली होती. या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या. याच बातम्यांच्या संदर्भ देत यासिन छवारे यांनी दिनांक १६ डिसेंबर, २०२४ सोमवार रोजी सकाळी ११.१५ वाजता दरम्यान अमित मेश्राम यांना फोन करून धमकी दिली की, ‘मोठा बाजारातील सिमेंट रस्ता मी बांधला आहे त्यामुळे यापुढे आपण बातम्या लावायच्या नाही’ शिवाय अमित मेश्राम यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आहे. या प्रकरणात पोलीस स्टेशन तुमसर येथे ऑडियो क्लिपच्या पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर जीवे मारण्याची धमकी देणे व अश्लील शिवीगाळ प्रकरणी तुमसर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३५१ व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे करीत आहे. या प्रकरणात आरोपीवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.
हेही वाचा – बिबट्याची संख्या वाढली… आता नसबंदी हा एकच जालीम…
हेही वाचा – VIDEO : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात विशालकाय अजगर जखमी; दोन तास शस्त्रक्रिया अन्…
या संदर्भात शिवसेनेचे विभागप्रमुख अमित मेश्राम यांनी नागपूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा पूर्व विदर्भ संपर्क नेते भास्कर जाधव यासह इतर वरिष्ठ नेत्यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धमकी देणाऱ्या नेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.