भंडारा : साकोली तालुक्यातील दांडेगाव जंगल शिवारात एका विवाहित महिलेचा सांगाडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा घातपात, वन्य प्राण्याचा हल्ला की अन्य काय अशा विविध तर्क वितर्कंना उधाण आले आहे.

आज सकाळच्या सुमारास काही गुराखी जंगल शिवारात जनावरे चराईसाठी घेऊन जात असताना लाखांदूर ते साकोली मार्गावरील दांडेगाव जंगल शिवारात एका महिलेचा सांगाडा दिसला. या घटनेची माहिती त्यांनी गावकऱ्यांसह लाखांदूर व दिघोरी (मोठी) पोलिसांना दिली. महामार्गालगतच्या जंगलात एक डोक्याची कवटी, हाताचे हाड व अन्य काही साहित्य दिसत आहेत. बाजूलाच साडी असून महिलेचे केस व मंगळसूत्र दिसत असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळसूत्र व साडीवरून हा सांगाडा महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा – Katol Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का?

हेही वाचा – अजित पवार पत्रकारांना रागावले; म्‍हणाले, “केव्‍हाही दांडकं समोर करायचं का?”

घटनेची माहिती होताच पोलीस उपअधीक्षक ईश्वर काकडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, दिघोरीचे ठाणेदार अमर धंदर, अड्याळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू, नंदेश्वर, क्षेत्र सहाय्यक सय्यद, पोलीस हवालदार उमेश वलके, यासह अन्य पोलीस अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.