जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात गौण खनिज तस्करी सुरू असून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला जात आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे. सध्या गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असलेले नवे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी या अवैध गौण खनिज तस्करांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केला आहे. साकोली येथे गौण खनिज तस्करांवर धडक कारवाई करीत तब्बल १ कोटी ६२ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साकोली तालुक्यात सुंदरी व पाथरी येथे दोन वेगवेगळ्या गौण खनिज तस्करांविरोधात झालेल्या कारवाईमध्ये अग्रवाल ग्लोबल कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद पांडे व साईट व्यवस्थापक वरूण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे की , साकोली, सडक अर्जुनी व देवरी तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण कार्य सुरू आहे. या कामाचे कंत्राट अग्रवाल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले आहे. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक व साईट व्यवस्थापक यांनी प्रशासकीय यंत्रणेला आर्थिकरित्या मॅनेज करून गौण खनिज मोठ्या प्रमाणात चोरी करीत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे . या अवैध गौण खनिज चोरीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.
हेही वाचा : नागपूर : टाटा उद्योग समूहाच्या विस्तारासाठी ‘मिहान’ योग्य ; नितीन गडकरी
साकोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दहा आरोपींना अटक करण्यात आली असून चार टिप्पर, दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी असा एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सुंदरी गावातील कारवाईत अग्रवाल ग्लोबल कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद पांडे व साईट व्यवस्थापक वरूण या दोन आरोपींसह टिप्पर चालक महेश शेंडे, निलेश हरी खंडाते, मनोज कुमार, पुरण पासवान, अजय उखमा यादव, इम्तियाज नबी रसूल अन्सारी, या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या प्रकरणात पाथरी गावाच्या उत्तरेस असलेल्या नाल्यांमधून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टर मालक पुरुषोत्तम अंताराम कापगते याच्यासह ट्रॅक्टर चालक अमर सेवक बोंडे, गुलशन गंगाराम बोरकर यांनाही अटक करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे अवैध खनिज तस्करांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा : सर्वधर्मसमभाव ही हिंदुत्वाची आधारशिला ; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
या कारवाईत ठाणेदार जितेंद्र बोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उईके, पुनम कुंभारे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कुरुडकर, प्रशांत गुरव, पोलीस कर्मचारी किशोर फूंडे, मोहन वलथरे, अमित वडेट्टीवार, संदीप भगत, अश्विन भोयर, राजेश सयाम, महिला पोलीस हवालदार भुरे, वाहन चालक स्वप्निल गोस्वामी, रमेश एडमाके यांनी सहकार्य केले.