भंडारा : धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती सध्या ठाणा पेट्रोल पंप गावातील नागरिक अनुभवत आहेत. जल जीवन मिशन योजनाअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आणि जुन्या दोन अशा चार पाण्याच्या टाक्या असताना ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नवीन टाक्या सुरू दोन वर्षांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असून नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे.
आयुध निर्माणी कारखाना जवाहरनगर जवळ ठाणा पेट्रोल पंप गाव वसलेले असून ६ हजाराच्या वर लोकसंख्या आहे. गावाच्या विकासासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असून गाव चार दिशेनी विभागले गेले आहे. गावात ५ वॉर्ड रचना असून नागपुर व भंडारा शहराशी या ठिकाणावरून प्रवासासाठी मुबलक साधने मिळत असल्याने गाव लोकसंख्येच्या प्रमाणात झपाट्याने वाढीत झेप घेत आहे. वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेता व गावातील पाणी क्षार युक्त असलेल्या पिण्यायोग्य पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने पूर्वी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे दोन टाकी उभारून पाणी पुरवठा केला जात होता. मात्र ती योजना ठाणा वासियांसाठी शोभेचा पांढरा हत्ती ठरला गेला.
१५५४ कुटुंब संख्या असलेल्या या गावातील २ वॉर्डातील फक्त ४५ च्या जवळपास कुटुंबीयांनाच या योजनेचा पाणी पुरवठा होत आहे. गावात २० च्या वर शासकीय व खाजगी विहिरी सोबत आठसे च्या जवळपास खाजगी हातपंप आहेत व ५५ शासकीय हातपंप मात्र येथील पाणी फ्लोरायड युक्त (क्षार पाणी) असल्याने पिण्यायोग्य नाहीत त्यामुळे गावातील नागरिक ग्रामपंचायत चे २ व खाजगी ४ असे ६ शुद्ध पाणी विक्रीचे आरो प्लांट मधून व बाटली बंद पाणी दर दिवसा विकत घेतून आपली तहान भागवीत आहेत.
अलीकडे कडक उन्हाळा सुरू झाला असून पाण्याची पातळी खोल गेल्याने त्याच्या झळा ठाणा पेट्रोल पंप वासियांना बसायला सुरुवात झाली आहे. फक्त मोजक्याच गावकऱ्यांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी मिळते व बाकीच्यांना मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी नेहमी ताटकळत असल्याने २०२२ २०२३ मध्ये जलजीवन मिशन योजना अंतर्गत ५ करोड रुपये मंजूर करण्यात आले असून टेंडर ही काढण्यात आले. अर्धवट बांधकाम सुद्धा केले आहे. परंतु वर्षभरापासून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नळयोजना सुरू झाली नाही. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी ताटकळत राहण्याची वेळ आली असून महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
जलजीवन मिशन योजना अंतर्गत जलकुंभाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु जुन्या पाइपलाइनचे कनेक्शन होते. नव्याने पाइपलाइन घालणे होते. परंतु ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाइपलाइनचे काम थांबवले गेले. एक वर्षापासून ग्रामस्थांना पाण्यासाठी वाट बघत राहावी लागत आहे. यासंदर्भात मे.जी.आर. कन्स्ट्रक्शन मुंबई येथील कंत्राटदाराला अनेकदा भ्रमणध्वनीवर संपर्क केले असतांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पाणीपुरवठा विभागाला पत्राद्वारे माहिती दिली असताना ही पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ठाणा पेट्रोल पंप ग्रामस्थांनी कुठपर्यंत वाट बघावी लागणार आहे, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे.
आता पासूनच गावात पाण्याची टंचाई आहे तर उन्हाळ्यात त्याहून पाण्याची टंचाई असते. त्यामुळे येथील नागरिकांना बाटली बंद तथा खाजगी आरो प्लांट धारकाकडून दर दिवसा खरेदी करून आणलेल्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. असे आणखी किती दिवस वाट पाहावी लागेल असा प्रश्न यावेळी उपस्थीत केला जात आहे.
पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासंबंधी कित्येकदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्रव्यवहार केला आहे. परंतु याबाबत अधिकारी बोलायला तयार नाही. कंत्राटदारांना अनेकवेळा भ्रमणध्वनी करूनही प्रतिसाद देत नाही. ठाणा पेट्रोलपंप ग्रामस्थांना पाण्यासाठी वंचित राहण्याची वेळ आली आहे. – पुरुषोत्तम ऊर्फ बापू कांबळे, सरपंच, ठाणा पेट्रोलपंप
ठाणा पेट्रोल पंप येथील पाणीपुरवठा योजनांचे काम अपूर्ण झाले आहे. केवळ पाण्याची टाकी व गावातील मोजक्याच वॉर्डांत पाइपलाइन घातले गेले आहे. कंत्राटदारांनी केलेल्या कामाच्या प्रमाणे शासनाकडुन मिळालेल्या तुट पुंज्या निधी मुळे, पुरेशा निधी कंत्राटदारांना मिळाला नसल्याने याचा विपरीत परिणाम गावातील जल जीवन मिशन योजनेचा कामावर दिसून पडत आहे. योग्य प्रमाणात निधी उपलब्ध झाला तर कंत्राटदारांना निधी वळता करून कामाला सुरुवात केली जाईल. – एफ.एल. बघेले, शाखा अभियंता, पाणीपुरवठा उपविभाग, भंडारा