भंडारा : शिकार करून वाघिणीचे तुकडे करून फेकल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. वनविभाग व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाईत चोवीस तासांत तीन आरोपींना पाचरा गावातून अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पी.बी. गोफणे, तुमसर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मिलिंद तायडे यांचे पथक पाचरा गावात पोहोचले. वनविभागाच्या स्निफर डॉग टीमच्या मदतीने तपास करण्यात आला. यात आरोपी राजू पिरतराम वरकडे याच्या घरातून जळलेली तार, मृत कुत्रा, वाघिणीचे केस आणि शिकारीसाठी वापरण्यात आलेले हत्यार तसेच जळलेले गवत आदी पुरावे सापडले. वरकडे यांच्या घरातून वाघिणीचे तुकडे कापण्यासाठी वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली. आरोपीने सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली, मात्र पोलीस व वनविभागाच्या पथकाने त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने शिकार केल्याची कबुली दिली.
हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांची पी. एफ.ची रक्कम थकली… महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
सोमवार, ६ जानेवारी रोजी झांझरिय येथे तीन पुलिया तलावाजवळ एका वाघिणीचे तुकडे करून फेकलेले असल्याची माहिती नागरिकांनी गस्तीदरम्यान वनरक्षक के. ए. मांढरे यांना दिली. माहिती मिळताच वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी गेलो असता वाघिणीच्या मृतदेहाचे चार तुकडे आढळून आले. वाघिणीची शिकार केल्यानंतर धारदार शस्त्रांनी तिचे तुकडे करून जंगलात फेकून दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वरकडे याने राजेंद्र महादेव कुंजम आणि दुर्गेश रतिराम लसुंटे या दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी ही कारवाई केली. उपवन संरक्षक राहुल गवई, उपविभागीय पोलीस अधिकारी पी.बी. गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मिलिंद तायडे, हवालदार जयसिंग लिल्हारे, दिंगंबर पिपरेवार व वनविभागाचे रेंजर रहांगडाले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा – केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल, पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढणे कारणीभूत!
रानडुक्करची शिकार करायची होती, पण वाघिणी अडकली
आरोपींनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या शेतात बसलेल्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने वाघीण ठार झाली. मात्र त्यांचा खरा उद्देश रानडुकराची शिकार करणे हा होता, परंतु ती वाघीण अडकली. वाघिणीच्या मृत्यूनंतर आरोपींनी मृतदेहाचे चार तुकडे करून जंगलात फेकले. वनविभागाने आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ९ अन्वये गुन्हा दाखल केला. ७ जानेवारी रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तेथून त्यांना ११ जानेवारीपर्यंत वनविभागाच्या कोठडीत पाठवण्यात आले.