बुलढाणा : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळासह शाहू परिवाराच्या हजारो चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेल्या ‘जाहीरनामा जनतेचा’ कार्यक्रमात अखेर, बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढण्याचे आपले इरादे आज संदीप शेळके यांनी जाहीर केले. जनतेचा आग्रह असेल तर आपण लढणारच असा ठाम निर्धार व्यक्त करून जनता हाच आपला पक्ष आणि बुलढाण्याचा चौफेर विकास हाच आपला झेंडा राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी ‘वन बुलढाणा मिशन’चे अध्यक्ष संदीप शेळके यांची प्रकट मुलाखत घेतली. आज, रविवारी (ता. २६) रोजी आराध्या लॉन्समध्ये पार पडलेली ही मुलाखत राजकीय, विकासात्मक जुगलबंदी ठरली. विदर्भपुत्र गणेशपुरे या हरहुन्नरी कलाकाराने टाकलेल्या प्रश्नरूपी ‘बोउन्सर्स’ वर शेळकेंनी लीलया चौकार-षटकार लगावले तर काहींना ‘डक’ करीत सफाईदारपणे बगल दिली. तब्बल दोन तास चाललेल्या या मुलाखतीचा जिल्ह्याभरातून आलेल्या विकासप्रेमी नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला. एरवी हास्य- विनोदाचे फवारे उडविणाऱ्या भारत गणेशपुरे यांचा ‘मूड’ काहीसा गंभीर होता. प्रारंभीच्या सत्रात जिल्ह्याचा विकास, विकासाची दृष्टी, अनुशेष यावर जोर देत ‘अँकर’च्या भूमिकेतील या कलावंताने नंतर मात्र विनोदाचे रंग उधळत कार्यक्रमाची रंगत अखेरपर्यंत कायम ठेवली.
हेही वाचा – नागपूर : तलाठी परीक्षेचा पेपर फोडणारा आरोपी आरोग्य विभागाच्या परीक्षेत पास
समारोपीय सत्रात गणेशपुरे यांनी विषय थेट राजकारणाकडे वळवित शेळकेंना बॅक फुटवर खेळवत ठेवले. ‘तुम्ही लोकसभा लढविणार काय आणि कोणत्या पक्षाकडून’ हा रोखठोक प्रश्न विचारून त्यांनी शेळकेंना त्यानंतरच्या प्रत्येक राजकीय प्रश्नांवर विचार करण्यास भाग पाडले. शेळके यांनी, आपण जनतेला भेटण्यासाठी लवकरच जिल्हा परिषद सर्कल निहाय संवाद यात्रा काढणार आहोत. यावेळी करण्यात येणाऱ्या संवाद आणि लेखी स्वरुपात व सोशल मीडियावरून आलेल्या नागरिकांच्या सूचना, निर्देश लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यांत जनतेचा जाहीरनामा तयार करणार आहोत. सर्व पक्ष आपला जाहीरनामा मांडतात, पण मी जनतेचा जाहीरनामा मांडणार आहे. तो जनतेच्या पसंतीस उतरला आणि जनतेने आग्रह केला तर आपण बुलढाणा लोकसभा निवडणूक लढविणार असे त्यांनी जाहीर केले. कोणत्या राजकीय पक्षाकडून लढविणार? या प्रश्नाला बगल देत जनता हाच आपला पक्ष राहील असे शेळके म्हणाले.
हेही वाचा – जिल्हा परिषद भरती : १४ लाख उमेदवारांचे अर्ज, १४५ कोटींचा महसूल जमा
जनता सोबत असली तर अपक्ष म्हणून दोन हात करणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. मतदारसंघातील साडेबाराशे गावांत व मतदान केंद्रात समांतर यंत्रणा उभी करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. समारोपात गणेशपुरे यांनी प्रातिनिधिक स्वरुपात उपस्थितांना बोलके करून प्रतिक्रिया जाणून घेतल्या.