नागपूर: २०२४ च्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन फोडा. त्यासाठी प्रत्येक समाज घटकातील पंधरा- पंधरा लाख कार्यकर्ते तयार करा. ईव्हीएम फोडणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा होईल. मात्र पुढे त्यांना आपण स्वातंत्रता सेनानीचा दर्जा देऊन नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देऊ, असे खळबळजनक वक्तव्य भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांचे केले.
नागपुरातील इंदोरा मैदानात काल आयोजित ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा भांडाफोड’ सभेत मेश्राम बोलत होते. मेश्राम पुढे म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन फोडा. त्यासाठी भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी आदेश देत आहे की झटपट तयारीला लागा. बैठका घ्या, लाखो कार्यकर्ते तयार करा. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांमध्ये घोटाळे होतात. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला त्यात सुधारणा करण्यासाठी अनेक वेळेला मागणी केली. मात्र निवडणूक आयोग ऐकत नाही. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनच्या विरोधात भारत बंद आंदोलन करणार आहो.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरे, अजित पवार, राहुल गांधी यांच्या बाबत काय म्हणाले भाजप खासदार?
मात्र जर ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सुधारणेबद्दल निवडणूक आयोगाने ऐकले नाही, तर २०२४ च्या निवडणुकांमध्ये सर्रास ईव्हीएम मशीन फोडा, असे वामन मेश्राम यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. २०२४ च्या निवडणुकीत देशभरात १५ लाख मतदान केंद्र असणार आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीन फोडण्यासाठी १५ लाख अनुसूचित जातीचे, पंधरा लाख अनुसूचित जमातीचे, पंधरा लाख भटक्या जमातीचे, पंधरा लाख अल्पसंख्याक समाजाचे तर पंधरा लाख महिला एवढे कार्यकर्ते तयार करण्याचे निर्देश मेश्राम यांनी दिले. एवढ्यावरच थांबले नाही तर ईव्हीएम फोडणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा होईल मात्र भविष्यात आपली सत्ता आल्यावर ईव्हीएम फोडणाऱ्यांना स्वतंत्रता सेनानी चा प्रमाणपत्र देऊ आणि त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देऊ असा अजब दावाही त्यांनी केला.
हेही वाचा >>> नागपूर : भाजपचे आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
ईव्हीएम मशिनद्वारे झालेल्या निवडणुकीत घोटाळे करून काँग्रेसने लोकसभा निवडणूक दोनदा तर भाजपने दोनदा जिंकली. दोनदा निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये समझोता झालयाचाही आरोपही मेश्राम यांनी केला. विशेष म्हणजे वामन मेश्राम यांनी ईव्हीएम मशीन च्या विरोधात सुरू केलेली राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार असून देशातील सर्व राज्यात ७७४ जिल्ह्यातून प्रवास करणार आहे.