बुलढाणा : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी संदर्भातील भारत राष्ट्र समितीचे धोरण, पक्षाचे सर्वेसर्वा तथा तेलंगणा च मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती, पश्चिम विदर्भ समन्वयक निखील देशमुख यांनी दिली. नियोजित महाराष्ट दौऱ्यात ते भूमिका स्पष्ट करतील असे सांगतानाच समिती भाजपची ‘बी टीम’ असल्याचा त्यांनी साफ इन्कार केला.
स्थानिय बुलढाणा जिमखाना येथे आज, शुक्रवारी दुपारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी पक्षाचे धोरण, सदस्य नोंदणी अभियान व लोकसभा निवडणूक तयारी याचा आढावा सादर केला. यावेळी बुलढाणा जिल्हा समन्वयक भैय्या पाटील, राजू इंगळे, मोहन शिंदे, शशिकांत लोखंडे हजर होते. समिती भाजपची बी टीम असल्याची टीका करणारे आज सत्तेत जाऊन बसले आहे. आपला पक्ष कोणत्याही पक्षाची बी टीम नसून शेतकऱ्यांची टीम असल्याचे देशमुख म्हणाले.
हेही वाचा >>>..तर व्यवसायावर गंडांतर! ‘महारेरा’ कायद्याअंतर्गत मालमत्ता दलालांना नोंदणी बंधनकारक
जिल्ह्यात सद्या पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान सुरू असून आजवर ८० हजार सदस्य झाले आहे. यासोबतच ग्रामस्तरावर पुरुष, महिला, युवक, शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती अश्या ११ समित्या स्थापन करण्यात येत आहे. यासाठी विधानसभानिहाय समन्वयक नेमण्यात आले आहे. पक्ष महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा >>>गोंदिया: मानसिक ताण-तणावातून युवकाने स्वत:वरच केला चाकुने वार
भैय्या पाटील यांनी शेत जमीन जप्तीच्या अन्यायकारक कारवाईकडे यावेळी लक्ष वेधले.शेतकरी कर्ज माफी योजनेत पात्र असतानांही जिल्ह्यातील ८ ते १२ हजार शेतकऱ्यांची शेत जमीन जप्त करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक व जिल्हा सहकारी बँकेतर्फे होणारी ही कारवाई तात्काळ रोखण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.बीआरएस याविरोधात आक्रमक आंदोलन करणार असून शेतकऱ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.