नागपूर : कौटुंबिक कलह, अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक तक्रारी सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या भरोसा सेलला गेल्या सात वर्षांत १५ हजारांवर तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १४ हजार ८०० तक्रारींचा निपटारा करण्यात आला. ५ हजार ९०० जणांचा विस्कळीत झालेला संसार भरोसा सेलने पुन्हा रुळावर आणला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम् यांनी गुन्हे शाखेच्या अंतर्गत २०१७ मध्ये भरोसा सेलची स्थापना केली. तेव्हापासून कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती वाद-विवादाच्या तक्रारींची नोंद भरोसा सेलमध्ये करण्यात येत आहे.

गेल्या सात वर्षांत भरोसा सेलमध्ये १५ हजार २७० तक्रारींची नोंद करण्यात आली. या तक्रारींपैकी १२ हजार ७७१ कुटुंबीयांचे भरोसा सेलकडून समुपदेशन करण्यात आले. कौटुंबिक हिंसाचारासह किरकोळ स्वरूपाच्या तक्रारीसुद्धा भरोसा सेलमध्ये करण्यात येतात. काही संवेदनशील तक्रारी सोडवताना पोलीस आणि समुपदेशकांना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु, भरोसा सेलमधील अनुभवी समुपदेशकासह पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने समस्यांवर तोडगा काढला जात आहे. भरोसा सेलमध्ये गेल्या सात वर्षांत ५ हजार ९३४ तक्रारींवर तोडगा काढण्यात आला आहे.

हेही वाचा >>>प्रियकराची लग्नास ना; अन्य युवकांसोबत लग्न करण्यास मनाई, यामुळे तरुणीने…

भरोसा सेल हे महिलांसाठी माहेरघर असल्याचे म्हटले जाते. परंतु, येथे महिलांच्याच नव्हे तर पुरुषांच्याही तक्रारी घेण्यात येतात. पत्नी, सासरची मंडळी किंवा स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांबाबतच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येते. प्रेमविवाहानंतर होणाऱ्या वादातून अनेकांनी तक्रारी दिल्या. त्यांचे समुपदेशन करून अनेकांचे संसार तुटण्यापासून वाचवण्यात आले.

संवादाअभावी तुटतायेत संसार

कुटुंबात संवाद कमी झाला आहे. त्यामुळे कौटुंबिक वादाच्या घटना घडत आहेत. कौटुंबिक तक्रारींमध्ये पती-पत्नी यांच्यातील अहंकारामुळे सुरळीत सुरू असलेल्या संसाराला ग्रहण लागत आहे. मात्र, भरोसा सेल अशा जोडप्यांचे समुपदेश करून त्यांची चूक लक्षात आणून देत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharosa cell has received over 15 thousand complaints in the last seven years adk 83 amy
Show comments