नागपूर : एक वृद्ध महिला रडतच भरोसा सेलमध्ये आली. तिने हंबरडा फोडला. ‘मॅडम…माझ्या हृदयातून माझा मुलगा हरवला हो…तो आता दिसत नाही, भेटत नाही आणि आई म्हणून आवाजही देत नाही…माझा मुलगा शोधून द्या हो..” अशी तक्रार वृद्धेने पोलिसांकडे केली. वृद्धेला धीर दिल्यानंतर ती म्हणाली, तीन मुलांपैकी एकाने तिच्याशी अबोला धरला. तिची विचारपूस किंवा भेट घेत नसल्यामुळे एका आईचे मन खिन्न आहे. मुलाला भरोसा सेलमध्ये बोलवले आणि मायलेकाचे मनोमिलन करुन दिले. आई आणि मुलगा या भावनिक नात्यातील गुंता पोलिसांनी अलगद सोडवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शाळेतच दारू आणि अनागोंदी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांची नोटीस,  संस्थाचालक म्हणतात

निशा (अभ्यंकरनगर) यांना वयाच्या तिशीत विधवा जीवन नशिबी आले. तीनही मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पतीच्या अचानक जाण्यामुळे निशा या चार घरची धुणी-भांडी करायला लागल्या. लोकांच्या घरचे उरलेले अन्न खाऊ घालून मुलांना मोठे केले. तीनही मुलांना शिक्षण दिले. पहाटे पाचपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत निशा काम करायला लागल्या. मुलगा विलास, आशिष आणि उमेश (मुलांची बदललेली नावे) चांगले शिक्षण घेतले. विलास आईला कामात मदत करायला लागला. त्यामुळे त्याने व्यवसाय थाटला. आशिष हा नोकरीला लागला तर लहान उमेश याने प्लास्टिकच्या वस्तू बनविण्याची कारखाना टाकला.  तिघांनीही पैसे गोळा करुन तीन माळ्यांचे घर बांधले. निशा यांनी तिनही मुलांचे लग्न लावून दिले. निशा या लहान मुलगा उमेशकडे राहत होत्या. उमेशने जुन्या घरात कारखान्याचा माल माल ठेवणे सुरु केले तर मोठा मुलगा विलास याला तेथे त्याचे कार्यालय थाटायचे होते. दोघांनीही आईकडे निर्णय सोपवला. आईने उमेशला तेथे कच्चा माल ठेवण्यास सांगितले आणि विलासला दुसरीकडे भाड्याने जागा घेण्यास सांगितले. आईच्या निर्णयामुळे विलास नाराज झाला.

हेही वाचा >>> बुलढाणा: पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा, पण मित्रपक्षांचीही नजर

आईशी धरला अबोला

कामावर जाताना रोज आईला भेटून जाणारा विलास आता हळूहळू घरी कमी यायला लागला. आईशी बोलणे बंद केले. तिला खर्चाला पैसे देणे बंद केले. भावंडाशीही बोलत नव्हता. पत्नी व मुलालाही आईकडे पाठवणे कमी केले. त्यामुळे तिनही भावंडांमधील नात्यात दुरावा निर्माण झाला. उमेश आणि आशिष एकमेकांकडे कुटुंबियांसह जाऊ लागले तर विलास एकटा पडला. त्यामुळे आईचेही मन दुखावले. दोन मुले एकत्र असतील आणि तिसरा मुलगा मात्र वेगळा पडेल, ही भीतीसुद्धा वाटायला लागली.

पोलिसांनी घडवली मायलेकाची भेट निशा या भरोसा सेलला आल्या. मुलाने अबोला धरल्याने खिन्न असल्याचे सांगितले. ‘माझा जर जीव गेला तर दोनही भावंडांपासून विलास तुटेल, अशी भीती बोलून दाखवली. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी वृद्धेची तक्रार ऐकून घेतली. अनिता गजभीये यांनी वृद्धेचे समूपदेशन केले. मुलगा विलासला तेथे बोलावून घेतले. त्याचे समूपदेशन करीतन आईच्या मनातील भावना समजून सांगितल्या. दोघेही मायलेकांची भेट घालून दिली. विलास आईला अलिंगन देऊन रडायला लागला. माफी मागायला लागला. आईने त्याला कवेत घेत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. मायलेकांचे मनोमिलन झाले. विलासने पानावलेल्या डोळ्यांनी आईला आपल्याच कारमध्ये बसवले. वृद्धेने कारमधूनच त्या खाकी वर्दीला दोन्ही हात जोडून नमस्कार घातला आणि घराकडे कुच केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharosa cell help to reconcile mother and son in nagpur adk 83 zws