अनिल कांबळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘त्या’ दोघांचे आठ वर्षे प्रेमप्रकरण चालले… कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्यांनी प्रेमविवाह केला… गोड मुलगी जन्माला आली… पण, दहा वर्षांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली… दोघांत वाद वाढले… ताटातूट झाली… पत्नीच्या विरहात पतीच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली… मृत्यू समोर दिसायला लागला तशी मुलगीही तीव्रतेने आठवू लागली… पण, पत्नीच्या मनातील कटूता संपली नव्हती… तिने भेटण्यास नकार दिला… अखेर पतीने भरोसा सेल गाठले अन् भरोसा सेलच्या प्रयत्नांनी या कुटुंबाचे मनोमिलन घडले…

हेही वाचा >>>वाशीम : अनंतराव देशमुख समर्थकांसह भाजपात; पुत्र ॲड. नकुल, चैतन्य यांचाही पक्षप्रवेश

रिया आणि निशांत (बदललेली नावे) हे दोघेही पदवीच्या प्रथम वर्षाला एकाच महाविद्यालयात होते. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम. ती पुढे शिक्षण घेत होती तर निशांतने नोकरी पत्करली. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांनी विरोध दर्शवला. त्यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्यांच्या सुखी संसारात मुलगी जुई आली. दरम्यान, करोनाचे संकट आले. त्यात निशांतची नोकरी गेली. निशांत बरोजगार, त्याची बहीणसुद्धा पतीशी वाद घालून कायमची माहेरी निघून आलेली. संसाराचा गाडा हाकणे निशांतसाठी कठीण झाले होते. अखेर रियाने नोकरीचा निर्णय घेतला. औषध विक्री प्रतिनिधी म्हणून तिला अनेक ठिकाणी भेटी द्याव्या लागत होत्या. त्यामुळे तिला घरी यायला उशीर होत होता. कमावत्या पत्नीबद्दल निशांतच्या मनात संशयाचे काहूर उठले. तिचे इतराशी अनैतिक संबंध असल्याचा त्याने आरोप लावला. दोघांचे वाद झाले. ती मुलीसह माहेरी निघून गेली. इकडे नैराश्यात गेलेला निशांत गंभीर आजाराने ग्रस्त झाला. त्याच्या हृदयावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. आता पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया होणार आहे. तो जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे त्याला शेवटची इच्छा म्हणून पत्नी आणि मुलीची भेट घ्यायची होती. दोघींचीही माफी मागून शस्त्रक्रियेला सामोरे जायचे होते. परंतु, पत्नी त्याचा फोन उचलत नव्हती.

हेही वाचा >>>एका प्रदेशाध्यक्षाला यशाने तारले, दुसऱ्यापुढे कर्तृत्वसिद्धतेचे आव्हान

नजरानजर होताच आसवांचा पूर

निशांतने अखेरचा प्रयत्न म्हणून पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांची भेट घेतली. सुर्वे यांनी रियाला फोन केला. मात्र, ती पतीला भेटायला तयार नव्हती. शेवटी तिला पतीच्या शस्त्रक्रियेबाबत सांगितल्यानंतर ती वरमली. पोलिसांच्या वाहनातून रिया आणि मुलीला भरोसा सेलमध्ये आणले. पती-पत्नींची भेट घालून दिली. दोघांच्याही भावनेचा बांध फुटला. त्याने मुलगी-पत्नीची माफी मागितली. पत्नी आणि मुलीला बाहुपाशात घेतले आणि ढसाढसा रडायला लागला. या क्षणामुळे भरोसा सेलमधील वातावरणही भावनिक झाले. पोलिसांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharosa cell organized family reunion in nagpur adk 83 amy