नागपूर : प्रेमविवाहानंतर दारूचे व्यसन लागलेल्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी दोन मुलांसह माहेरी निघून गेली. खासगी नोकरी करून दोन्ही मुलांचा सांभाळ करायला लागली. मात्र, पतीचे अतिमद्यसेवनाने निधन झाल्याचा निरोप मिळाला. महिला मुलांना घेऊन पतीच्या अंत्यदर्शनासाठी पोहचली. मात्र, सासरच्या मंडळींनी तिला अंत्यसंस्कारापासून रोखले. हा वाद भरोसा सेलपर्यंत पोहचला. पोलिसांनी दोघांचीही बाजू ऐकून घेत दुःखद स्थितीतही तोडगा काढल्याने वाद निवळला. तनुश्री ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जयळ्यातील आशीषच्या प्रेमात पडली. शिक्षण पूर्ण होताच दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तनुश्रीच्या श्रीमंत वडिलांनी प्रेमविवाहास नकार दिला. तनुश्रीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन आशीषशी प्रेमविवाह केला. आशीष एका कंपनीत नोकरीवर लागला. कालांतराने त्यांना एक मुलगा व मुलगी झाली. मात्र, १० वर्षे सुरळीत संसार सुरू असताना आशीषला दारूचे व्यसन लागले. तो दारूच्या व्यसनात एवढा बुडाला की त्याची नोकरी गेली. त्याने तनुश्रीला नोकरी करण्यास भाग पाडले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

तिच्या पगाराचीही तो दारू प्यायला लागला. शारीरिक व मानसिक त्रास वाढल्यामुळे ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. दारूच्या व्यसनामुळे आशीषचा भाऊ व बहिणीसह वडिलांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. २३ जानेवारीला अतिमद्यसेवनाने घरातच त्याचा मृत्यू झाला. दोन दिवसानंतर शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी आल्यानंतर आशीषचे निधन झाल्याचे उघडकीस आले. आशीषचे वडील, भाऊ, बहिणीसह अन्य नातेवाईक गोळा झाले. त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. दरम्यान, तनुश्रीला पतीचे निधन झाल्याचा निरोप मिळाला. ती दोन्ही मुले, आई-वडील आणि भावंडांसह अंत्यदर्शनाला पोहचली.

अंत्यसंस्कारापूर्वीच सासऱ्याने घातला वाद

तनुश्रीला दोन्ही मुलांसह माहेरची मंडळी बघताच ७० वर्षीय सासऱ्यांच्या मनात भलतेच काही सुरू होते. पतीच्या निधनानंतर त्याची संपत्ती हडपण्याच्या उद्देशाने तनुश्री आल्याचा संशय त्यांना आला. मुलाच्या अंत्यसंस्कारापूर्वीच वृद्ध सासऱ्याने सुनेशी वाद घातला. ‘संपत्तीतील एक रुपयाही सुनेला देणार नाही. माझ्या संपत्तीवर सुनेचा किंवा तिच्या मुलांचा काही अधिकार नाही.’ असा वाद घालून गोंधळ घातला. काही नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यामुळे तनुश्री व तिच्या मुलांना पतीचे अंत्यदर्शन करता आले.

भरोसा सेलमध्ये तक्रार

७७ वर्षीय सासऱ्याने सुनेविरुद्ध भरोसा सेलमध्ये तक्रार केली. ‘संपत्तीमध्ये हिस्सा मागण्यासाठीच ती कट-कारस्थान रचत असून माझ्या जीवाला धोका आहे,’ असा आरोप केला. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी डाकेवाड आणि अंमलदार रोशनी बोरकर यांनी वृद्धाची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर सुनेला बोलावण्यात आले. ‘मला फक्त माझ्या पतीचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. माझ्या मुलांना वडिलांचा चेहरा पाहण्याची शेटवची संधी होती. सासऱ्यांनी गैरसमजातून माझ्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे सर्व संपत्ती सासऱ्यांनाच देण्यात यावी,’ अशी भूमिका मांडली. त्यामुळे तेथे उपस्थित सासऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharosa cell settled dispute of woman with father in law after husband death adk 83 zws