नागपूर : विद्यार्थी दशेतच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि कुटुंबीयांचा विरोध पत्करुन दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, लग्नानंतर तिच्या जीवनात नवीन प्रियकराने प्रवेश केला. त्यासाठी तिने अंगात एका बाळाचे भूत येत असल्याचे नाटक केले आणि सासरच्या कुटुंबीयांना त्रस्त करुन सोडले. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये पोहचले. भरोसा सेलने प्रेमप्रकरणाचा त्रिकोणी गुंता सोडून तोडगा काढून पुन्हा संसार फुलवला.

श्रेया (बदललेले नाव) ही दहावीत असताना जरीपटक्यात राहणाऱ्या मावशीकडे नेहमी येत होती. तिच्या मावशीच्या घराजवळ शुभम (२७) हा युवक राहत होता. श्रेया आणि शुभमची मैत्री झाली. दहावीतील श्रेयाला शुभम आवडायला लागला. तिने शुभमला प्रेमाची मागणी घातली. दोघांचेही प्रेमप्रकरण कुटुंबियांच्या लपून सुरु होते. श्रेयाने बारावीची परिक्षा दिली आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यान शुभमने मंडप डेकोरेशनचा स्वतःचा व्यवसाय थाटला.

शुभम आणि श्रेया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्रेयाने आपल्या आई-वडिल आणि मावशीसोबत चर्चा करुन शुभमशी लग्न लावून देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, श्रेयाच्या कुटुंबियांनी तिच्या प्रेमविवाहास विरोध केला. त्यामुळे दोघेही निराश झाले. त्यांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही घरातून पळून जाऊन मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला. दोघांचाही सुरळीत संसार सुरु झाला. काही दिवसांनंतर दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचे लग्न मान्य करीत सहकार्य केले.

श्रेयाचे जिवनात नव्या प्रियकराचा प्रवेश

लग्नानंतर शुभमने व्यवसायाकडे लक्ष देऊन पैसे कमविण्याला प्राधान्य दिले. तर श्रेयाने घरी राहण्याऐवजी पुढील शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले. पदवीचे शिक्षण घेताना महाविद्यालयातील वर्गमित्र आशिषवर तिचे प्रेम जडले. दोघांचेही प्रेम महाविद्यालयात बहरले. मात्र, श्रेया विवाहित असल्यामुळे अडचण झाली. श्रेयाला शुभमशी काडीमोड घेऊन आशिषशी संसार थाटायचा होता.

अंगात भूत येण्याचे नाटक

श्रेयाने पतीच्या घरात अंगात एका बाळाचे भूत येण्याचे नाटक केले. हुबेहुब अभिनय केल्यामुळे कुणालाही संशय आला नाही. त्यामुळे सासरचे कुटुंब त्रस्त झाले. शुभमने भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांची भेट घेतली. समूपदेशन समिधा इंगळे यांनी दोघांनीही बोलावून सत्यता जाणून घेतली. श्रेयाने भूताचे नाटक करीत असल्याची कबुली देऊन आशिषसोबत प्रेमविवाह करण्याची मत व्यक्त केले. आशिषला विचारणा केली असता त्याने मात्र शेवटच्या क्षणी लग्न करण्यास नकार देऊन पळ काढला. शेवटी शुभमने मन मोठे करुन श्रेयाला माफ करुन नव्याने आपला संसार सुरु केला.

Story img Loader