अनिल कांबळे
नागपूर : पतीचे आजारपणात निधन झाल्यानंतर महिलेने तीन मुलांना पोटाशी घेत चार घरची धुणीभांडी करीत जीवन कंठले. स्वतः उपाशी राहून मुलांच्या पोटापाण्याची सोय केली. मात्र, त्याच मुलांनी लग्न झाल्यानंतर वृद्ध आईला घरात ठेवण्यास नकार दिला. त्या वृद्ध मातेला भरोसा सेलने मायेची ऊब दिली. तिच्या तीनही मुलांना समुपदेशनाचा धडा शिकवून वृद्धेला हक्काचे घर मिळवून दिले. लक्ष्मीबाई (७५) असे त्या दुर्दैवी मातेचे नाव आहे.
वयाच्या २५ व्या वर्षी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे आजारपणात निधन झाले. त्यावेळी लक्ष्मीबाई यांना एका वर्षाची मुलगी आणि ४ व ६ वर्षांची दोन मुले होती. घरातील एकमेव कमावता आधार गेल्यामुळे लक्ष्मीबाई एकाकी पडल्या. पडतीच्या काळात नातेवाईकांनीही साथ दिली नाही. घरातील अन्न-धान्य संपल्यानंतर त्यांच्यासह मुलांवर उपाशी राहण्याची वेळ आली. अशा स्थितीत लक्ष्मीबाईने खचून न जाता धुणी-भांडीचे काम स्वीकारले. दोन वेळचे अन्न मिळवण्याचा मार्ग लक्ष्मीबाईला मिळाला. परंतु, तेवढ्या पैशात तीन मुलांचे पालनपोषण होत नव्हते.
शिक्षण-कपड्याचा खर्च लक्ष्मीबाईला झेपवत नव्हता. त्यामुळे लक्ष्मीबाईने सकाळी धुणी-भांडी तर सायंकाळी भाजीपाला विकायला सुरुवात केली. त्यांनी दोन्ही मुलांना शाळेत घातले तर चिमुकल्या मुलीला घेऊन कामावर जाऊ लागली. कठीण परिस्थितीत लक्ष्मीबाईने काबाडकष्ट करून तीनही मुलांचा सांभाळ करीत पालनपोषण केले. मुले मोठी झाली आणि आईला हातभार लावायला लागली. त्यामुळे लक्ष्मीबाईचे दिवस पालटले. दोन्ही मुलांचे लग्न आटोपले. मात्र, नव्याने आलेल्या सुनांना वृद्ध लक्ष्मीबाई जड झाली. वयोमानामुळे थकलेल्या आईकडून काम होत नसल्यामुळे मुलांनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले. दोनही सुनांनी तिला जेवण देण्यास नकार दिला तसेच घरातून बाहेर काढले. लक्ष्मीबाईवर वृद्धावस्थेत बिकट वेळ आली.
हेही वाचा >>> भंडारा : ड्रग्ज, गांजाचे सेवन आणि विक्री करणारी भिक्षेकरांची टोळी शहरात सक्रिय
लक्ष्मीबाईचे हाल बघून शेजारी राहणाऱ्या तरुणीने त्यांना भरोसा सेलमध्ये नेले. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी तक्रार ऐकून घेतली. वृद्धेला चहा-नाश्ता दिला. तिच्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले. कमावत्या असलेल्या दोन्ही मुलांचे समुपदेशन केले. आईने केलेल्या काबाडकष्टातून भावंडांना मोठे करून स्वतःच्या पायावर उभे केल्याची जाण करून दिली. मुले आणि सुनांचीही समजूत घातली. समुपदेशनातून समस्या निवळली.
वातावरण झाले भावनिक
दोन्ही मुलांचे पालनपोषण करण्यासाठी कशा हाल-अपेष्टा सहन केल्या आणि कशी उपाशी राहून दिवस काढले, याची हंबरडा फोडून लक्ष्मीबाईने कल्पना दिली. त्यामुळे दोन्ही मुलांनाही पश्चात्ताप होत होता. वृद्धेवर ओढवलेल्या प्रसंगामुळे भरोसा सेलमधील वातावरण भावनिक झाले होते. वृद्धेचे अनुभव ऐकताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मात्र, तक्रारीचा शेवट गोड झाला. मुलांना आपली चूक उमगली आणि त्यांनी आईला माफी मागून पुन्हा सन्मानाने घरी नेले.