लोकसत्ता टीम

नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे बुधवारी येथील सुरेश भट सभागृहात आयोजित प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला.विशेष म्हणजे कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सुरेश भट सभागृहात बुधवारी सायंकाळी ६ वाजता प्रा. शाम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘संविधान बचाओ-महाराष्ट्र बचावो ’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. त्याच बरोबर सध्याची राजकीय स्थिती, लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील बेरोजगारी, उद्योग गुजरातला जाणे, संविधानाचे रक्षण करण्यासाठी उपाय, महाराष्ट्रातील पोलिसांची अवस्था, आरक्षणाचे काय होणार? इत्यादी विषयांवर श्याम मानव आपली भूमिका व्याख्यानात मांडणार होते. सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होता. मात्र त्यापर्वीच श्रोत्यांची गर्दी सभागृहात होऊ लागली होती. या श्रेत्यांमध्येच भारतीय जनता युवा मोर्चेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बसले होते.

आणखी वाचा-अमरावती : युवकाची हत्‍या अन् संतप्‍त नागरिकांचा पोलीस ठाण्‍यासमोर ठिय्या

मानव यांचा व्याख्यान सुरू होण्याच्या दुसरे वक्ते दशरथ मडावी बोलत होते. त्यांनी त्यांच्या भाषणात संविधान धोक्यात आल्याचा उल्लेख केला. तेव्हा श्रोत्यांमधील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून २०१४ नंतरच संविधान कसे काय धोक्यात आलं हे सांगा? असा प्रश्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत मडावी यांनी भाषण सुरूच ठेवले. तेव्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते घोषणा देत व्यासपीठाच्या दिशेने चालत गेले. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठाच्या पायऱ्यांजवळ अडवले. त्याच वेळेस व्यासपीठाच्या पाठीमागे लावलेला कापडी फलक एकाने फाडला. दरम्यान सभागृहात गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात उपस्थित श्रोत्यांनी प्रतिघोषणा देणे सुरू केले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी श्याम मानव यांना लगेच सुरक्षा वेढा घातला व त्यांना व्यासपीठावर बसून राहण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत भाजायुमोच्या कार्यकर्त्यांना सभागृहाचे बाहेर काढले.

आणखी वाचा-विदर्भातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे महायुती, महाविकास आघाडीचे लक्ष्य

पुन्हा कार्यक्रमाला सुरूवात

गोंधळ घालणाऱ्यांना सभागृहातून बाहेर काढल्यावर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला.फाडलेले कापडी फलक चिकटपट्टीने जोडून पुन्हा लावण्यात आले. त्यानंतर शाम मानव यांचे भाषण झाले.

आम्ही फक्त प्रश्न विचारला – भाजयुमो

आम्ही फक्त प्रश्न विचारला, त्याचा उत्तर दिलं गेलं नाही, म्हणून आम्ही घोषणा दिल्या. सभेत वक्ते कुठेही अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भातले मुद्दे न मांडता विशिष्ट पक्षासाठी समर्थनाचे मुद्दे मांडले जात होते, असा दावा भाजयुमो कार्यकर्त्यांनी केला.व्यासपीठावरील फलक फाडल्याचा त्यांनी इन्कार केला.

“संविधान धोक्यात आहे हेच आम्ही सांगत आहोत, तेच सभेत घातलेल्या गोंधळाच्या निमित्ताने घडले. मला अशा गोंधळाची सवय आहे. यामुळे मी विचलीत झालो नाही. माझे म्हणने मी मांडतच राहणार आहे” -प्रा. श्याम मानव, संस्थापक,संघटक, अंनिस.