नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आज ( १९ डिसेंबर ) आठवा दिवस आहे. या अधिवेशनात लक्षवेधी न लागल्यानं शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “याही अधिवेशनात माझी लक्षवेधी लागली नाही. हे सतत माझ्याबरोबर घडत आहे. माझा हक्क डावलण्यात येत आहे,” असा आरोप भास्कर जाधवांनी केला. तर, यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी “मनातून गैरसमज काढून टाकावा,” अशी विनंती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भास्कर जाधवांनी काय म्हटलं?

भास्कर जाधव म्हणाले, “मला सभागृहात बोलायला दिलं पण माझी लक्षवेधी लागली नाही. मी आपलं अभिनंदन एवढ्यासाठी करतो की, याही अधिवेशनात सात डिसेंबरला माझी लक्षवेधी लागली होती. काही कारणास्तव ती पुढं गेली. लक्षवेधी पुढं गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती लागते. मात्र, याही वेळेला माझी लक्षवेधी लागली नाही. हे सातत्यानं माझ्याबाबत घडत आहे. माझा हक्क डावलण्यात येत आहे.”

“मला खुर्चीचा अपमान करायचा नाही”

“चार-पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात. पण, सभागृहात घडलेल्या घटनांबाबत लक्षवेधी लागत नाही. हा अध्यक्षांकडून माझ्यावर आणि मतदारसंघातील जनतेवर अन्याय आहे. तो अन्याय होऊ नये म्हणून मी विनंती केली. मात्र, अभिनंदन करून मला आपला आणि खुर्चीचा अपमान करायचा नाही,” असं भास्कर जाधवांनी सांगितलं.

“सदस्य उपस्थित नसल्यावर लक्षवेधी स्थगित करतो”

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलं, “भास्कर जाधवांनी लक्षवेधी पुढं ढकलण्याचं कारण तपासलं जाईल. सभागृहात सदस्य उपस्थित नसल्यावर ती लक्षवेधी आपण स्थगित करतो अथवा सदस्यांच्या विनंतीनंतर पुढं ढकलतो. मंत्री उपस्थित नसल्यानं किंवा उत्तर आले नसल्यानं लक्षवेधी पुढं ढकलण्यात आली असेल, तर ती बुधवारच्या कामकाजात दाखवेन.”

“गैरसमज काढून टाकावा”

“सभागृहात काम करताना कुठलाही अध्यक्ष सदस्यांना लक्ष्य करून बोलण्याची संधी नाकारू शकत नाही. त्यामुळे आपण गैरसमज काढून टाकावा,” अशी विनंती राहुल नार्वेकरांनी भास्कर जाधवांना केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav angry on laksh vedhi vidhansabha rahul narvekar winter session nagpur ssa