नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. मात्र, या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – … तर तुमचे २०- २५ आमदार आमच्याकडे येतील, विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर बावनकुळे यांचा टोला

काय म्हणाले भास्कर जाधव?

“विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दुर्देवाने आणावा लागला. कारण त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांची भूमिका सत्ताधारी पक्षाच्या बाजुने राहिली आहे. सत्ताधाऱ्यांच्या बाजुने निर्णय देणं, त्यांनी मांडलेल्या विषयाला प्राधन्य देणं. त्यांनी मांडलेला प्रस्ताव स्विकारलाच पाहिजे आणि विरोधीपक्षाला त्यावर बोलूही न देणं, त्यांच्या या भूमिकेतून हे कधीतही घडणारच होतं”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

“आम्हीही गेली ३० वर्ष या सभागृहाचे सदस्य आहोत. त्यामुळे असे पक्षपाती निर्णय झाले, तर विरोधीपक्षाच्या हातात दुसरा पर्याय नसतो. अध्यक्षांविरोधात बोलायचं नाही. बोललं तर जयंत पाटील यांच्यासारखी कारवाई होणार, आमदारांना निलंबित करणार, दादागिरीने सभागृह चालवणार, मग विरोधीपक्षाने काय करायचं? विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय कसा द्यायचा? त्यांनी त्यांची भूमिका कशी पार पाडायची?” असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “हा ठराव निलंबनाचा नसून अविश्वासाचा आहे, त्यासाठी..”, राहुल नार्वेकरांविरोधातील ठरावाबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितला नियम!

दरम्यान, या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नाही. यावरून महाविकास विकास आघाडी फुट असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली. याबाबत विचारलं असता, “मीडियाला सातत्याने वाटतं की महाविकास आघाडीमध्ये फुट पडली आहे. या अविश्वास प्रस्तावावर ३९ आमदारांची सही आहे आणि विरोधी पक्षात १२५ आमदार आहेत. त्यामुळे असा प्रस्ताव दाखल करताना सर्वांनीची स्वाक्षरी घेणं गरजेचं नाही. ज्यावेळी हा प्रस्ताव चर्चेला येईल”, तेव्हा आम्ही सर्व एकसंघ दिसू, असे ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav reaction on no confidence motion against rahul narvekar without ajit pawar sign spb