नागपूर : काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आम्ही तिघेही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहे. दावा प्रत्येक पक्षाने केला पाहिजे. पूर्व विदर्भात २८ जागा आहे. त्यापैकी १४ जागा आमच्या हक्काच्या असून त्यासाठी आम्ही आग्रही असणार आहे. विदर्भात आमची ताकद वाढत आहे त्याचा फायदा आघाडीला होणार असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
भास्कर जाधव नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पूर्व विदर्भात २८ जागा आहे. २०१९ मध्ये शिवसेना- भाजप एकत्र लढले आणि त्यावेळी १४ जागावर आमचे उमेदवार जिंकले होते. त्यामुळे आघाडीमध्ये कोणाचे वर्चस्व आहे हे पाहण्यापेक्षा नैसर्गिक न्यायानुसार त्या १४ जागांवर आमचा हक्क आहे आणि त्यासाठी आम्ही आग्रही राहणार असल्याचे जाधव म्हणाले. जागांवर चर्चा होऊ शकते किंवा अदलाबदल होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या जागांवर आम्ही दावा करत नाही. पण आमच्या त्यावेळच्या युतीच्या जागा होत्या त्या आम्हाला मिळाल्या पाहिजे हा आमचा दावा कोणावर कुरघोडी करण्यासाठी नाही तर आमचा हक्क आहे असेही जाधव म्हणाले.
हेही वाचा : वर्धा: जलाशयातून विसर्ग, पुरस्थितीमुळे बचाव पथके सज्ज
शिवरायांचा पुतळा…
ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा होता. त्याच ठिकाणी तो उभा राहिला पाहिजे. मात्र भ्रष्टाचारी लोकांच्या हातून पुन्हा हा पुतळा उभा राहता कामा नये. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचे सरकार आणावे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी पुतळा उभारेल असेही जाधव म्हणाले.
हेही वाचा : मुनगंटीवार म्हणाले, “जागा वाटपाबाबत महायुतीत एकमत…”
पवार यांचा सत्कार म्हणून केला
कुठल्याही पक्षाचे नेते माझ्या जिल्ह्यात येतात तेव्हा शाल श्रीफळ भेट देणे आणि विचार आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हेच संस्कार माझ्या मुलांवर आहे. त्यामुळे त्याने अजित पवारांचा जाऊन सत्कार केला आहे त्या काही गैर नाही. तो सत्कार देणे लपून केला नसून जाहीरपणे केला असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. संजय राऊत यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही मात्र त्यांना शंभर दिवस कारागृहात राहावे लागले होते. सत्तेत असलेल्या नेत्याच्या विरोधात काही बोलायचे नाही अशा पद्धतीचे सध्या मनमानी काम सरकारचे सुरू आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला फटका बसला आणि त्यांचे ४०० पारचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा आम्ही लोकशाही व संविधान वाचविण्याचे आवाहन जनतेला करणार असून महायुती सरकारला सत्तेवर येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे.