मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यावरून बुधवारी जोरदार झाला. यावेळी शिवसेना ( ठाकरे गट ) आणि शिंदे गटातील कार्याकर्ते आमने-सामने आले. महाराष्ट्रात असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी दावा सांगितला आहे. यावरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला देत टोला लगावला आहे.
“एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सत्तेत आहे. शिवसेनेची कार्यालय, लोक ताब्यात घेऊन फार काळ पक्ष पुढे जाणार नाही. या पद्धतीने जनतेच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण होईल. मुंबई महापालिकेतील कृत्य शोभा देणार नाही. ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के मुंबई पालिकेत जातात. तुमचा काय संबंध आहे,” अशा शब्दात भास्कर जाधव यांनी खडसावलं आहे.
“एकनाथ शिंदेंनी हे प्रकार…”
“मुंबई पालिकेत शिवसेनेची सत्ता होती. आता प्रशासकीय राजवट लागू आहे. पण, कार्यालय तुझं की माझं यातून तुम्ही लोकांचं प्रश्न सोडवण्याची जागा खालसा केली. एकनाथ शिंदेंनी हे प्रकार थांबवले पाहिजेत. असा कब्जा करू तुम्हाला शिवसेना प्रमुखांचा वारसदार म्हणून तसा चेहरा बनवता येणार नाही,” असं भास्कर जाधवांनी म्हटलं आहे.
“भाजपाची प्रत्येक कृती सूचक आणि स्वार्थाची…”
विधानसभेबाहेर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं बॅनर लावण्यात आलं होतं. यामध्ये मुख्यमंत्र्यांचा लहान तर उपमुख्यमंत्र्यांचा मोठा बॅनर होता. यावरून भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना सावधानतेचा इशारा दिला. “भाजपा हा चाणक्यांचा पक्ष आहे. भाजपा नेहमीच आपल्या मित्रांना ‘कट टू साईज’ करणारा पक्ष आहे. आपले मित्र संपवायचे ही रणनीती कायम राहिली आहे. भाजपाची प्रत्येक कृती सूचक आणि स्वार्थाची असते. एकनाथ शिंदेंनी सावध रहावे,” असं भास्कर जाधव म्हणाले.