यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्याने खा. भावना गवळी या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना कोणतीही मदत करणार नाही, असे बोलले जात होते. राजश्री पाटील यांची उमदेवारी जाहीर झाल्यावरही भावना गवळी रिसोड येथे आपल्या घरी निवांत होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर गवळी थेट राजश्री पाटील यांच्यासमवेत प्रचारात फिरताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर स्वत: संसदेत जाण्यासाठी दिल्लीवारी हुकलेल्या भावना गवळी आता, राजश्री पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन करीत आहेत.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधीत्व करूनही भाजपच्या दबावात शिंदे गटाने या मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना येथून उमेदवारी दिली. उमेदवारी न दिल्याने भावना गवळी व त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले. त्यांनी रोष व्यक्त केला. गवळींनी महायुतीच्या सर्व कार्यक्रमांवर अघोषित बहिष्कार टाकला व रिसोड येथे घरी शांत बसून राहणे पसंत केले. त्या महायुतीच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी झाल्या नाही.
हेही वाचा…‘देवेंद्र फडणवीसांसारखा खोटारडा माणूस इतिहासात…’ संजय राऊत म्हणाले, पुलवामासारखा भयंकर प्रकार…’
दरम्यान, गेल्या आठवड्यात मंत्री उदय सामंत आणि पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांची भेट घेऊन त्यांना पक्षहितासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली. सोबतच त्यांचा योग्य सन्मान करण्याचा शब्दही दिला. त्यानंतर भावना गवळी यांनी वाशीम येथे पत्रकार परिषद घेऊन आपण महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. परंतु, जोपर्यंत गवळी या राजश्री पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांच्यासोबत दिसणार नाहीत तोपर्यंत आम्हीही उघड प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली.
हेही वाचा…एस.टी.बसेसवर शिवसेनेच्या जाहिराती ! आचारसंहितेचा भंग; काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
भावना गवळी यांची महायुतीच्या उमदेवारावरील नाराजी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडेल, अशी चर्चा असतानाच गवळी यांनी सर्व हेवेदावे, नाराजी दूर सारून त्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सक्रिय झाल्या. मतदारसंघात राजश्री पाटील यांच्यासोबत सभांना उपस्थित राहण्यासोबतच त्या घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. राजश्री पाटील या उत्तम वक्त्या आहेत. त्यांना दिल्लीत निवडून पाठविल्यास त्या सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या भावना समर्थपणे मांडतील, असा विश्वास गवळी आता मतदारांना देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भावना गवळी या राजश्री पाटील यांना पराभूत करण्यासाठी सर्व प्रयत्न करतील, अशा चर्चांना विराम मिळाला आहे.