यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोण, हे अद्यापही जाहीर झालेले नाही. येथील उमेदवारीवर शिवसेना (शिंदे गट) च्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी पूर्वीपासूनच दावेदारी सांगितली आहे. उमेदवारीचा तिढा सोडविण्यासाठी भावना गवळी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीस गेल्या होत्या. आज गुरुवारी मुंबईहून परतताच त्या एकदम सक्रिय झाल्या. येथील निवाससस्थानी त्यांनी विधानसभानिहाय महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी याच उमेदवार असतील, अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात येते. शिवाय पक्षांतर्गत विरोधक मंत्री संजय राठोड यांनीही भावना गवळी यांच्या उमेदवारीस समर्थन दिल्याचा दावा भावना गवळींचे समर्थक करत आहेत. गवळी यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> यवतमाळ – वाशिममधील उद्धव ठाकरेंच्या सभांचा महाविकास आघाडीला कितपत फायदा ?

खासदार भावना गवळी यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असून, भाजपने केलेल्या विविध सर्वेक्षणातून ते पुढे आले, असा दावा भाजपच्या वतीने आजपर्यंत करण्यात येत होता. भाजपने मतदारसंघातील सर्वेक्षणाचे कारण देत, या मतदारसंघात भावना गवळी यांच्याऐजवी अन्य कोणास उमेदवारी द्यावी, असा तगादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावला होता. मात्र भावना गवळी यांनी महायुतीच्या मेळाव्यात ‘मेरी झांसी नहीं दुंगी’ म्हणत भाजप आणि पक्षांतर्गत विरोधकांच्या मनसुब्यांना आव्हान दिले होते. तेव्हापासून थेट पंतप्रधानांसह, मुख्यमंत्री आदींच्या भेटी घेत आपण कसे योग्य दावेदार आहोत, हे भावना गवळी सातत्याने सांगत आहेत. पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर न केल्याने नागरिकांमध्ये व पक्षातही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या त्यांनी पटवून दिले. आपण गेल्या पाच टर्मपासून सातत्याने निवडून येत आहोत, शिवसेनेतील एकमेव महिला खासदार असून, विविध दिग्गजांना पराभूत केल्याची आठवणही गवळींनी करून दिल्याचे सांगण्यात येते. 

हेही वाचा >>> चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

या मतदारसंघासाठी भावना गवळी यांच्यासह संजय राठोड, मनीष पाटील व अन्य दोन, तीन नावे चर्चेत आहेत. भाजपकडून मदन येरावार यांनाही विचारणा झाली. मात्र संजय राठोड व मदन येरावार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यात स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे या नावांशिवाय महायुतीकडे विजयाची खात्री असलेला अन्य उमेदवार नसल्याने शेवटच्या क्षणी येथील उमेदवारीची माळ भावना गवळी यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता   व्यक्त होत आहे. असे झाल्यास जातीय मतांचेही ध्रुवीकरण होणार आहे. महायुतीकडून भावना गवळी तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख  रिंगणात राहण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवार मराठा, कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे मराठा, कुणबी समाजाची मते कोणाच्या पारड्यात पडतील, यावर आता मतदारसंघात अंदाज लावले जात आहेत. आज भावना गवळी यांनी आपल्या निवासस्थानी विधानसभानिहाय बंदद्वार बैठक घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप मिळाला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत हे बैठकसत्र सुरू होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavana gawali started preparing for lok sabha election after meeting with cm eknath shinde nrp 78 zws