लोकसत्ता टीम
यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडीत हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना महायुतीने शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी दिली. मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकृत घोषणा न केल्याने अर्ज दाखल करेपर्यंत काहीही होऊ शकते, याचे दडपण राजश्री पाटील समर्थकांमध्ये असल्याचे दिसत आहे.
अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरूवारी स्वत: यवतमाळ येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजतानंतर राजश्री पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे सांगितले जात आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र शेवटच्या क्षणी राजश्री पाटील उमेदवारी दाखल करणार की, ऐनवेळी आणखी कोणी नवीनच उमेदवार अर्ज दाखल करेल, याबाबत कार्यकर्त्यांत अद्यापही धाकधूक आहे. ‘बदलत्या राजकीय घडामोडीत काय होईल काही सांगता येत नाही. आपणही योग्य निर्णयाची प्रतीक्षा करीत आहोत’, अशी प्रतिक्रिया संभाव्य उमेदवार राजश्री पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. मंत्री संजय राठोड यांनी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची केली आहे. राजश्री पाटील यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभे राहण्याच्या सूचना त्यांच्याकडून समर्थकांसह कार्यकर्त्यांना गेल्या आहेत. बुधवारी महायुतीच्या निवडक नेत्यांची यवतमाळात बैठक झाली, त्यातही महायुतीचा उमेदवार कोणीही असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी उमेदवारास निवडून आणण्याचे मिशन हाती घेण्याचे ठरविण्यात आले.
राजश्री पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच भावना गवळी समर्थकांनी तीव्र आक्षेप घेत निदर्शनेही केली. भावना गवळी समर्थक राजश्री पाटील यांच्या मार्गात अडथळे आणण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भावना गवळी या मतदारसंघात पोहाचल्या असून त्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. गवळी यांनी अर्ज दाखल होईपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. मात्र राजश्री पाटील याच महायुतीच्या उमदेवार राहिल्या तर भावना गवळीसुद्धा अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ही निवडणूक रंजक होणार आहे, असे दिसते. एकूणच महायुतीतील ही अनागोंदी सध्यातरी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली आहे. महायुतीचा उमदेवार जाहीर होताच महाविकास आघाडीच्या गटात आता निवडणूक एकतर्फी होवून संजय देशमुख यांचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा रंगली आहे.
शंका खरी ठरणार, ऐनवेळी उमेदवार बदलाची शक्यता…
महायुतीने राजश्री पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. राजश्री पाटील व हेमंत पाटील हे सुद्धा यवतमाळ-वाशीममधून लढण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता शिवसेनेच्या वतीने जीवन पाटील यांचे नावे पुढे आले आहे. महायुतीच्या काही नेत्यांची जीवन पाटील यांच्यासोबत येथील हॉटेल वरण्यमध्ये बंदद्वार चर्चा सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. जीवन पाटील यांना ऐनवेळी एबी फॉर्म देवून त्यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आता महायुतीत वर्तविली जात आहे. जीवन पाटील हे उद्योजक असून यवतमाळचे खासदार दिवंगत उत्तमराव पाटील यांचे धाकटे बंधू आहेत.