लोकसत्ता टीम
यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण, हा गुंता अधिकच वाढला आहे. शिवसेना (शिंदे) गटाने गुरूवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत यवतमाळ-वाशीमच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे बुधवारी भावना गवळी यांच्या समर्थकांना मुख्यमंत्र्यांनी ‘कामाला लागा’ अशा सूचना केल्या होत्या, या सूचना वल्गना तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.
यवतमाळ-वाशीम मतदारसंघात उमेदवारीबाबत प्रारंभापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. येथील विद्यमान खासदार भावना गवळी यापूर्वी पाचवेळा शिवसेनेकडून निवडून आल्या असल्या तरी, भाजपने भावना गवळी यांना उमेदवारी देवू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील गवळी समर्थकांनी भावना गवळी यांनाच उमेदवारी द्यावी, यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. त्यामुळे दोनवेळा मुख्यमंत्र्यांनी भावना गवळी समर्थकांना कामाला लागा, उमेदवारी गवळींनाच मिळेल, अशी ग्वाही दिली होती. गुरूवारी शिवसेना (शिंदे) गटाचे उमेदवार जाहीर होतील तेव्हा भावना गवळी यांचे नाव असेल, अशी चर्चा जिल्ह्यात होती. मात्र यादी जाहीर होताच गवळी समर्थकांना जोरदार धक्का बसला. यवतमाळ-वाशिमच्या जागेबाबत पेच आहे, हे यातून स्पष्ट झाले.
आणखी वाचा-यवतमाळ वाशीम लोकसभेचा तिढा सुटता सुटेना; शिंदे गटाच्या पहिल्या यादीत भावना गवळी यांचे नाव नसल्याने…
पुसदच्या बंगल्यातूनही उमदेवारीसाठी हालचाली
पुसदच्या नाईक कुटुंबानेही उमेदवारीच्या शर्यतीत उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पुसद येथील आमदार इंद्रनील नाईक व त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. भाजप या मतदारसंघात मंत्री संजय राठोड यांनी निवडणूक लढवावी म्हणून आग्रही आहे. संजय राठोड यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगितले आहे. त्यामुळे मध्यंतरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, काँग्रेसचे मनीष पाटील यांच्या नावावरही महायुतीत चर्चा झाली. या चर्चा सुरू असताना आता आमदार इंद्रनील नाईक यांनी आपल्या पत्नीसाठी येथून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने सर्व तिढा वाढल्याचे सांगण्यात येते. मोहिनी नाईक या मूळच्या गुजरातच्या असून अमित शहांच्या निकटस्थ आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशीममध्ये आता शेवटच्या क्षणी काहीही होवू शकते, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. दुसरीकडे यवतमाळ-वाशीमचा उमेदवार कोण, यावरून राजकीय सट्टाबाजारही तेजीत आला आहे.
यवतमाळ-वाशिमची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला आहे. ४ एप्रिल ही उमेदवारी दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. त्यामुळे दोन दिवसांत कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेवून शिवसेनेला उमेदवार जाहीर करणे क्रमप्राप्त आहे. सध्या तरी भावना गवळी समर्थकांनी देव पाण्यात बुडवून ठेवल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.