वाशीम : एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे व सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रिसोड तालुक्यातील सवड येथे सोमवारी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, पौर्णिमा कांबळे यांचा भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात मिस्टर अँड मिसेस वानखेडे यांची वाढती उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले ते मुंबई येथे शाहरुख खान यांच्या मुलावर केलेल्या कारवाईमुळे. समीर वानखेडे यांचे मूळ गाव वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरूड तोफा असून मागील काही महिन्यांपासून त्यांचा जिल्ह्यात वावर वाढला आहे. मिस्टर अँड मिसेस वानखेडे कुटुंबातून आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत क्रांती रेडकर यांच्या नावाची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. परंतु आमच्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नसून केवळ सामाजिक सेवा करू असे वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>एकशे दोन वर्षे जुन्या रुग्णालयाची वास्तू ठरतेय धोकादायक; डॉक्टर, कर्मचारी जीव मुठीत घेऊन देत आहेत सेवा
रिसोड तालुक्यातील सवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बौद्ध पौर्णिमा निमित्त सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व पौर्णिमा कांबळे यांच्या भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये एन सी बी चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे व सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांची प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या नावाची जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगत आहे.