उद्या, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लहानापासून ज्येष्ठांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, स्वाक्षरी असलेला शर्ट, टी-शर्ट खरेदी करण्यासाठी भीम सैनिकांची मोठी धडपड सुरू आहे. कुणी ऑनलाइनवर तर कुणी दुकानात जाऊन शर्ट, टी-शर्ट, कुर्ते खरेदी केले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. १४ एप्रिलला अनेकजण पांढरे वा निळे वस्त्र परिधान करण्याला पसंती देतात, तर कुणी बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी, फोटो असलेल्या शर्ट, टी-शर्ट, कुर्ती, साडी, घालण्याला पसंती देतात. त्यामुळे यंदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी, फोटो असलेल्या शर्ट, टी-शर्ट, कुर्ती, साडी, सलवार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.
हेही वाचा >>>सावधान..! सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल
महिलांमध्ये धम्मचक्र साडीची क्रेझ
आंबेडकर जयंतीदिनी महिला पांढऱ्या साड्या परिधान करत असतात. त्यामुळे पांढऱ्या साडीला निळी बॉर्डर असणारी, तसेच साडीवर धम्मचक्र असणारी साडी, पिंपळाचे पान असणारी साडी बाजारपेठेत तसेच ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. या साडीचा महिलांची प्रचंड पसंती मिळत आहे.