नागपूर : मराठा समाजाच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला सरकारने मान्यता दिली असली तरी सरकारने दिलेल्या मसुद्यानुसार ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला.
मराठा आरक्षणासंबंधी निघालेल्या मसुद्यात सगेसोयरेचा अर्थ पितृसत्ताक असा उल्लेख केला आहे. सरकारने ओबीसींच्या बैठकीत शब्द दिला तो सरकारने पाळला असल्याने आमचा याला विरोध नाही. आजोबा, वडील यांचा पुरावा असल्यास त्याला विरोध नाही. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने मराठा समाजाबाबत काढलेल्या मसुद्यामधील सत्य वडेट्टीवार आणि भुजबळ यांनी समाजासमोर आणले पाहिजे. उगाच राजकीय स्वार्थासाठी समाजाची दिशाभूल करू नये, असेही तायवाडे म्हणाले.
हेही वाचा – वर्धा : १३ शेतकऱ्यांचा बळी जावूनही पुनर्वसन नाहीच
यासंदर्भात लवकरच दोन्ही नेत्यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही अशा शब्द दिला आहे. महसुली प्रमाणपत्रामध्ये ज्यांची मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी आहे त्यांचाच ओबीसी प्रवर्गात समावेश होणार आहे. वास्तविक ओबीसीमध्ये ४०० जातींचा समावेश आहे. महसुली प्रमाणपत्रामध्ये ज्या नोंदी सापडत आहे त्या आधीपासूनच आहे, ते सवलतीचा लाभ घेणारे आहे. नागपूर जिल्ह्यात २ लाख ९० हजार किंवा विदर्भातील ९ लाखांच्यावर सापडलेल्या नोंदी जुन्याच आहे. नव्याने ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा विषय नाही. मात्र, राज्यातील नेत्यांकडून २ कोटी मराठ्यांचा नव्याने समावेश करण्यात येत असल्याचे संभ्रम समाजामध्ये पसरविला जात आहे. हा गैरसमज पसरिवणे बंद करण्यात यावा, असेही तायवाडे म्हणाले.
हेही वाचा – सरकारच्या अधिपत्याखालील मंदिरात भ्रष्टाचार, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा आरोप
आजपासून जणगणना जनजागृती रथयात्रा
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने नागपूर जिल्ह्यात ओबीसी जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचे नेतृत्व महासंघाचे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजू चौधरी करणार आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमी येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील विविध गावांत ही यात्रा जाणार असल्याचे तायवाडे यांनी सांगितले.