भंडारा: “जिस भाई को देसी कट्टा, रिवॉल्वर चाहिए, मेरे नंबर पर तुरंत कॉल करें, मेरा मोबाइल नंबर, व्हॉट्सअॅप नंबर पर कॉल करें, तुरंत व्हॉट्सअॅप ओन्ली व्हॉट्सअॅप ७७२८८७८८३८,” अशी पोस्ट भूपेश मोटघरे नामक एका तरुणाने फेसबुकवर टाकली. सोबत देशीकट्ट्यासह फोटोही टाकला. या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे.
फेसबुकवरील ही पोस्ट प्रसारित होताच सायबर पोलिसांनी भूपेश मोटघरे याचा शोध घेतला. भूपेश हा मूळचा पवनी तालुक्यातील अड्याळ येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला गाठले आणि पोस्टबद्दल विचारणा केली असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, त्याच्या नावाच्या अकाउंटवरून कुणी तरी अशी पोस्ट टाकली, याबाबत तो अनभिज्ञ होता.
हेही वाचा… वादग्रस्त पोस्टप्रकरणी दोघे ताब्यात; गडचिरोली पोलिसांची पुणे-नागपुरात कारवाई
भूपेशने ताबडतोब भंडारा सायबर पोलीस ठाण्यात जाऊन यासंबधी तक्रार केली. आता फेसबुकवरून देशी कट्टा विकणारा हा भूपेश कोण, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यासंदर्भात फेसबुक कंपनीलाही पत्र लिहिण्यात आले असल्याचे भंडारा सायबर पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी सांगितले आहे.