लोकसत्ता टीम
अकोला : मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग विविध मार्गाने मिळालेल्या उत्पन्नातून मालामाल झाला आहे. सप्टेंबर महिन्यात भुसावळ विभागात तब्बल १३४ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले. सर्वाधिक उत्पन्न प्रवासी रेल्वे भाड्यातूनच प्राप्त झाले आहे.
सणासुदीच्या काळामध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंची मोठी संख्या आहे. बहुतांश रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. महसूल प्राप्तीसाठी रेल्वेला देखील याचा चांगलाच लाभ झाला. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाच्या वाणिज्य विभागाला सप्टेंबर महिन्यात भरपूर महसूल मिळाला.
आणखी वाचा-नांदेडमधील अधिष्ठात्यांचा अपमान, नागपुरात वैद्यकीय शिक्षक संतप्त..
सप्टेंबर महिन्यात एकूण १३४.०३ कोटींचा महसूल प्राप्त झाला. त्यामध्ये सर्वाधिक प्रवासी वाहतुकीतून ६६.०८ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले. माल वाहतुकीतून ३४.१७ कोटी रुपये मिळाले. याशिवाय पार्सल वाहतुकीतून १२.४३, तिकीट तपासणीच्या ४८ प्रकरणातून ३.५० कोटी, पार्किंगमधून ३६.२८ लाख, वाणिज्य प्रसिद्धी, जाहिराती आणि इतर १६.२७ लाख, खानपान ४२.३९ लाख व भुसावलच्या वाणिज्य विभागाची फुटकर राशी एक कोटी २४ लाख रुपये मिळाले आहेत.