अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल साडेसात लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला. या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. विविध रेल्वेस्थानकांसह गाड्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या आर्थिक वर्षात भुसावळ मंडळाने तिकीट तपासणी चमूद्वारे विविध तपासणी मोहिमांचे आयोजन केले. या मोहिमांच्या अंतर्गत, एकूण साडेसात लाख प्रकरणांमध्ये ५६ कोटीची रक्कम वसूल केली गेली. रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास, सामान्य तिकीट काढून आरक्षण डब्यातून प्रवास, निम्न श्रेणीचे तिकीट असताना उच्च श्रेणीतून प्रवास, विनातिकीट फलाटावर वावर आदी प्रकारांमध्ये तिकीट तपासणीसांकडून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

तिकीट तपासणीसाठी मुख्य डिजिटल पुढाकार घेण्यात आले. त्यात १०० टक्के संगणकीकृत टीटीई लॉबी १७ स्थानांवर कार्यान्वित केली. रेल्वे रोख जमा ट्रिप आयडीद्वारे, टीटीई अ‍ॅप इंस्टॉल आदी १०० टक्के केले. त्यामुळे यूटीएस तिकीट सत्यापन सोपे झाले. प्रवाशांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी एक आठवड्याचे विशेष अभियान राबवले.

रेल्वे मदत तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद मिळवण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्रतिसाद चमूची स्थापना करण्यात आली आहे. भुसावळ मंडळाने तिकीट तपासणी आणि प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून राबवलेल्या या डिजिटल आणि प्रभावी उपाययोजनांमुळे वसुलीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि प्रवाशांसाठी सोपी झाली. या पुढाकारांमुळे केवळ महसूलातच वाढ झाली नाही, तर प्रवाशांच्या समाधानात आणि रेल्वेवरील विश्वासातही वाढ झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गाडीतून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला.

जाहिरात महसुलातून ७.५८ कोटी, तर ‘पार्सल’मधून २९.९६ कोटीचे उत्पन्न

भुसावळ मंडळाने वाणिज्य जाहिरात महसुलात ७.५७ कोटीच्या लक्ष्याला पार केला. यावर्षी ७.५८ कोटीचा महसूल मिळवला. गेल्या वर्षीच्या ६.४९ कोटीच्या विक्रमाला मागे टाकत यावर्षी सर्वाधिक महसुलाची वसुली करण्यात आली आहे.भुसावल मंडळाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पार्सल महसूल क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश प्राप्त केले. यावर्षी पार्सल महसूल २९.९६ कोटी प्राप्त झाला. मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. ही वाढ मंडळाने पार्सल वाहतूक आणि संबंधित सेवांमध्ये केलेल्या नावीन्यपूर्ण उपाययोजनांचा आणि सुधारणाचा परिणाम असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.