भंडारा : जंगल सफारी करताना अनेक जंगलांमध्ये आपण ‘घोस्ट ट्री’ अर्थात भुताचे झाड बघतो. पांढऱ्या सालीचे आक्राळविक्राळ झाड बघून मनात कुठेतरी भीतीही वाटू लागते. मात्र भंडारा जिल्ह्यात एक असे भुताचे झाड आहे ज्याने अनेकांना चक्क भुरळ घातली आहे. हो, पण हे ‘भुताचे झाड’ म्हणजे एक आगळावेगळा लघुचित्रपट. लाखनी तालुक्यातील रेंगोळा गावातील एका ध्येयवेड्या तरुणाने स्वतःचा मोबाईल विकून तयार केलेल्या या लघुचित्रपटाची निवड औरंगाबाद येथील फिल्म फेस्टीव्हलमध्येही झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेंगोळा या छोट्याशा गावामधील करणला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात आणि लिखाणाची आवड होती. वयाच्या सतराव्या वर्षी बाराव्या वर्गात शिकत असतानाच त्याने ‘कष्टाची भाकर’ हे नाटक लिहिले. या नाटकाचे सव्वाशेच्या वर प्रयोग सादर झाले असून रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीवर एक नवी ओळख निर्माण झाली. आता आपल्या अंगी असलेल्या सुप्तगुणांचा वापर करून ‘भुताचं झाड’ या लघुचित्रपटाचे स्वतः लेखन आणि दिग्दर्शन केले. त्यासाठी त्याने स्वतःचा मोबाईल विकला आणि मित्राच्या मोबाईलच्या सहायाने या लघु चित्रपटाचे चित्रीकरण केले. हा लघुचित्रपट यूट्यूबवर प्रसारित केल्यानंतर एका दिवसातच हजारो व्ह्यूज या लघु चित्रपटाला मिळाले आहेत.

हेही वाचा – वाशीममध्ये एकच महिन्यात तिसऱ्यांदा सापडली गावठी पिस्तूल; कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, नागरिकांमध्ये दहशत

फिल्म फेस्टीवलमध्ये निवड

औरंगाबाद येथील रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये ‘भुताचं झाड’ या लघुचित्रपटाची निवड करण्यात आली. यामध्ये कलाकारांच्या मुख्य भुमिकेत व्यंकटराव खंडाईत, शिवा मेश्राम हे असून त्यात ताराचंद मेश्राम, दयाराम कांबळे, गिरीधारी डोंगरवार, उमेश भुसारी, परसराम मेश्राम, राजू झलके, निकीता कावळे यांनी व इतर कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. यात सर्व स्थानिक कलाकार आहेत हे विशेष आहे.

हेही वाचा – मलकापूरनजीक भीषण अपघात; आयशर व ट्रॅव्हसची धडक, चार ठार

कष्टाची भाकर या नाटकाने मला एक नवी ओळख दिली आहे. लहानपणापासूनच या क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे आता याच क्षेत्रात अविरत कार्य करायच ठरविलं आहे. माझ्या पहिल्या लघुपटाची इंटरनॅशनल फेस्टीवलला निवड झाली ही माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टिमसाठी आनंदाची बाब आहे. परिपूर्ण साधन सामग्रीचा साठा नसल्यामुळे वाटतं तेवढ सोपे पण नव्हतं. – करण लुटे, लेखक व दिग्दर्शक

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhutache zad short film enthralls the residents of bhandara district ksn 82 ssb
Show comments