*  प्रगत प्रवासी वाहनांमुळे रिक्षा अडगळीत

*  चालकांकडून नवीन रोजगाराचा शोध

सायकलरिक्षाला कधीकाळी नागपुरात प्रचंड ग्लॅमर होते. कारण, शहरांतर्गत वाहतुकीचे तेच प्रमुख साधन होते. परंतु पुढे प्रगत तंत्रज्ञानामुळे वाहतुकीची अनेक साधने आली आणि सर्वसामान्य नागपूरकरांचे सारथ्य करणारा रिक्षा आपोआपच अडगळीत पडला. ऐकेकाळी २० हजारांवर संख्या असलेल्या रिक्षा आज केवळ बोटावर मोजण्याइतके उरले आहेत. सायकलरिक्षाची विक्रीच होत नसल्याने त्यांचे उत्पादनही बंद झाले आहे.

आधी शहरात कुठेही जायचे असले की ऑटो किंवा सायकल रिक्षा असे दोनच पर्याय होते. कमी खर्चामुळे व वेळेच्या उपलब्धतेमुळे साहजीकच दुसरा पर्याय निवडला जायचा. अश्वशक्तीऐवजी मानवी शक्तीला जास्त महत्त्व असलेला तो काळ होता. याच सायकल रिक्षातून जात असताना रस्त्यात चढाव आला की खाली उतरून पायी चालावे लागे, रिक्षाला ढकलावे लागे. पण, यात कधी कुणी कमीपणा वाटून घेत नव्हते. इच्छित ठिकाणी पोहचल्यावर घामाघूम झालेल्या रिक्षाचालकाकडे बघून ठरल्यापेक्षा आपणहून दोन पैसे जास्त देणारीही माणसे होती. एकंदर  काय तर रिक्षा हे माणसांना माणसांशी जोडणारे माध्यम होते. परंतु माणूस जोडणारे साधन आज जवळजवळ नामशेष झाले आहे. कॅब व ऑटो रिक्षामुळे आज रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. गल्लीबोळात फिरण्यासाठी सायकल रिक्षा महत्वाचं साधन मानले जायचे पण त्याच आकारात निर्माण झालेल्या ई—रिक्षांमुळे  सायकल रिक्षाची ती गरजही संपवून टाकली आहे.

काय म्हणतात रिक्षाचालक?

*  आधी ५०० ते ६०० रु. रोज मिळायचे. आज २०० ही मिळवणे कठीण झालेय

*  प्रवासी मिळत नसल्याने सायकल रिक्षा विकून ऑटोरिक्षा घेतले

*  भाडय़ाने घेतलेल्या सायकल रिक्षाचे साधे भाडेही निघत नाही

*  प्रवाशांऐवजी माल वाहतूक सुरू केली, पण श्रम खूप पडतात

काय म्हणतात रिक्षा उत्पादक?

*  ‘नागपूर रिक्षा कंपनी’ आणि ‘तिरुपती ट्रेडर्स’ यांनी सायकल रिक्षांचे उत्पादनच बंद केलेय

*  अनेक उत्पादक  ई—रिक्षा व मालवाहतूक करणाऱ्या तीन चाकी रिक्षांना प्राधान्य देत आहेत

*  जे भाडय़ाने रिक्षा देत होते त्यांनीही रिक्षा कमी दरात विकून हा व्यवसायच बंद केला आहे

सायकलरिक्षाचा इतिहास

सायकल रिक्षा हा प्रकार १८६८ साली सर्वप्रथम जपान येथे बघितला गेला. सुरुवातीला मालवाहतुकीसाठी निर्माण झालेला रिक्षा अल्पावधीतच प्रवासी वाहतुकीसाठी लोकप्रिय झाला. भारतात हा प्रकार  येण्यासाठी १९८० साल उजाडावे लागले. सर्वप्रथम सिमला येथे व नंतर २० वर्षांनी कोलकाता येथे सायकल रिक्षा धावायला लागले. आधी चिनी व्यापाऱ्यांनी मालवाहतुकीसाठी त्याचा भारतात उपयोग सुरू केला व नंतर सरकारी परवानगीने प्रवासी वाहतुकीसाठी वापर सुरू झाला.