नागपूर : राज्यभरात पावसाला सुरुवात झाल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी २३ हजार २६५ मेगावॅटवर आली आहे. मुंबईतही विजेच्या मागणीत घट झाली असून शनिवारी राज्यात या वर्षातील निच्चांकी विजेची मागणी नोंदवली गेली.
राज्याच्या बऱ्याच भागात मे आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्ह-पावसाचा खेळ सुरू होता. त्यामुळे विजेच्या मागणीत चांगलाच चढ-उतार पहायला मिळाला. जूनमध्ये मोसमी पाऊस लांबल्याने पावसाअभावी उकाडा वाढला. यामुळे वातानुकुलीत यंत्र, पंख्यांसह विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने विजेची मागणीही वाढली. परंतु गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून कृषिपंपांचा आणि सर्वसामान्य ग्राहकांकडून विजेचा वापर कमी झाल्यामुळे २४ जून २०२३ रोजी दुपारी ५ वाजता विजेची मागणी केवळ २३ हजार २६५ मेगावॅट नोंदवली गेली. त्यापैकी ३ हजार ३ मेगावॅट मागणी ही मुंबईची होती.
राज्यातील विजेची मागणी उन्हाळ्यात २८ हजार मेगावॅटपर्यंत तर मुंबईत ४ हजार मेगावॅटपर्यंत गेली होती. त्यामुळे मध्यंतरी महावितरणला इतर स्रोतांकडून महागडी वीज खरेदी करावी लागली होती. आता मागणी घटल्याने महावितरणला दिलासा मिळाला आहे. महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांनी, पावसामुळे राज्यात तापमान घटल्याने विजेची मागणी यंदाच्या निच्चांकी स्तरावर आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
राज्यातील विजेची सद्यस्थिती
राज्यात २४ जून २०२३ रोजी दुपारी ५ वाजता विजेची मागणी २३ हजार २६५ मेगावॅट होती. त्यापैकी राज्यात १४ हजार ९८९ मेगावॅटची निर्मिती होत होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ८ हजार २१० मेगावॅट वीज मिळत होती, तर महानिर्मितीच्या औष्णिक, जलविद्युत, सौर, गॅस वीज निर्मिती प्रकल्पातून ६ हजार ५३७ मेगावॅटची निर्मिती केली जात होती. अदानीकडून १ हजार ८७७, जिंदलकडून ७९१, आयडियलकडून २७०, रतन इंडियाकडून १ हजार ६३, एसडब्लूपीजीएलकडून ३३७ वीज निर्मिती केली जात होती.
जूनच्या पहिल्या आठवड्यातील स्थिती
राज्यात ३ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजता विजेची मागणी २८ हजार ‘मेगावॅट’ होती. ५ जूनला ही मागणी २६ हजार ८३० ‘मेगावॅट’वर आली, तर ७ जूनला राज्यात विजेची मागणी दुपारी ३ वाजता २७ हजार ९६२ ‘मेगावॅट’ होती. त्यामुळे उन्ह-पावसामुळे मागणीत खूपच बदल पहायला मिळत होते.