वर्धा : सध्या बियाणे खरेदीचा बाजार जोरात आहे. खरीप हंगामाची लगबग म्हणून शेतकरी बंधू बियाण्यांसाठी धावपळ करीत असल्याचे बाजारातील चित्र आहे. मात्र खरेदीत कबड्डी व पंगा या दोन कापूस वाणांची जोरात चर्चा आहे. कारण बहुतांश याच वाणांचा आग्रह धरीत आहे.
गतवर्षीपासून याच बियाण्याचा शेतकरी आग्रह धरत असल्याचे ऐकायला मिळाले. एक तर हे वाण हलक्या तसेच बागायती जमिनीत सारखेच फुलते. माध्यम स्वरुपाचे सहा ग्रामचे बोंड निघते. एकरी आठ ते पंधरा क्विंटल सरासरी मिळत असल्याचे सांगितल्या जाते. गतवर्षी मुसळधार पावसात अनेकांचे नुकसान झाले होते. मात्र कबड्डीने त्यातही आधार दिल्याचे अनुभव आहेत. त्यामुळेच यावेळी या वानांना चांगलीच मागणी होत आहे.
कबड्डीची आठशे रुपये किमतीची पिशवी काही ठिकाणी पंधराशे रुपयात विकल्या जात आहे. कृषी खात्याच्या भरारी पथकाने काही तालुक्यांत हा काळा बाजार रोखला. मात्र तरीही कबड्डी व पंगा हेच ग्रामीण भागात परवलीचे शब्द ठरले आहेत.