अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याचे संकेत आहेत.
शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात १५ फेब्रुवारीला विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला, तर आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील कामकाज ठप्प पडले आहे.
सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवित करून जुनी योजना लागू करा, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार दहा:वीस:तीस वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा, सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचारी संघटनांनी हे आंदोलन पुकारले आहे. आज ‘नुटा’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी विद्यापीठ परिसरात संपकर्त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संबोधित केले. स्थानिक पातळीवर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख आणि ऑफीसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे.