चंद्रपूर: तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गोंडपिपरी, राजुरा, जिवती, कोरपना या तालुक्यात प्रतिबंधित चोरबीटी बियाण्याची तस्करी करणाऱ्या तस्करांचे मोठे रॅकेट सक्रीय झाले आहे.
तेलगंणातून अवैधमार्गाने जिल्ह्यात आणून तीन हजार रूपये प्रतिकिलो खुली चोरबीटी विकण्याचा सपाटा सुरू आहे. गावागावांत चोरबीटी पुरविणारे तस्कर निर्माण झाले आहे. मात्र, याकडे जिल्हा व तालुका कृषी विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तर, तस्करांना पोलिसांचा आशीर्वाद असल्याने कार्यवाही करण्याचे सोडून तस्करांना संरक्षण देत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा… विदर्भातील पंढरपुरात सापडले ३५० वर्षांपूर्वीचे प्राचीन कुंड
उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्यात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. तसेच गोंडपिपरी, राजुरा, कोरपना व जितवी या भागात या तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून कापूस पिकाचा पेरा प्रचंड वाढला आहे. कृषी केंद्रात अधिकृत कापसाचे बियाणे असतानाही केवळ तणाचा त्रास वाचविण्यासाठी बंदी असतानाही शेतकरी बांधव चोरबीटी बियाणाचा वापर करतात. शेतकरी बांधवाच्या याच अगतीकतेचा फायदा घेत सीमेवरील तालुक्यात चोरबीटी तस्करांचे मोठेजाळे निर्माण झाले आहे.
हेही वाचा… गडचिरोली: पदवी प्रवेशाचे स्वप्न भंगले! अपघातात मामा-भाचीचा मृत्यू
गावागावांत तस्कर तयार झाले असून, त्यांचे अनेक दलालही आहेत. तीन हजार रुपये किलो या भावाने खुली चोरबीटी विकण्याचा सपाटा या तस्करांनी सुरू केला आहे. हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र, याकडे कृषी विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पोलिसांचा तर या तस्करांना आशीर्वाद असल्यासारखी स्थिती आहे. तेलगंणाच्या सीमावर्ती परिसरात तर हा अवैध व्यवसाय धुमधड्याक्यात सुरू आहे. पण याकडे कुणाचेच लक्ष नाही. चोरबीटी तस्कर, विक्रेते व दलालांचे कृषी विभाग व पोलिस विभागाशी ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचे बोलले जात आहे. चोरबीटीची धडाक्यात विक्री होत असतांना याचा थांगपत्ता कृषी विभाग व पोलिसांना लागू नये ही आश्चर्याची बाब आहे. तेलगंणा सीमावर्ती भागातील हा अवैध प्रकार रोखण्यासाठी कृषी विभाग सतर्क होईल का असा प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा… ‘आरटीई’ प्रवेशाचे शासनाकडे १८०० कोटी थकीत, ‘आप’चे आंदोलन
नव्यानेच रूजू झालेले जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी कृषी विभागाच्या भरारी पथकाचा आढावा घेतला. यामध्ये भरारी पथकांनी एकाही ठिकाणी कारवाई केली नसल्याने लक्षात येताच तोटावार यांनी नाराजी व्यक्त करीत तालुका कृषी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
तेलंगणा पोलिसांची महाराष्ट्रात कारवाई
काही दिवसांपूर्वी गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी येथे तेलंगणा पोलिसांनी पाच क्विंटल चोरबीटी जप्त केली होती. या कार्यवाहीत आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. तेलंगणाचे पोलिस महाराष्ट्रात येवून कार्यवाही करीत असताना गोंडपिपरीचे पोलिस व कृषी विभाग काय करीत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.