लोकसत्ता टीम

अकोला : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांव्यतिरिक्त आतापर्यंत १२०४ उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये २९० अनारक्षित गाड्या तसेच ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा देखील समावेश आहे. आता प्रवाशांच्या हितासाठी आणखी सहा अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांच्या सेवा चालवल्या जाणार आहेत.

भिवंडी – सांकराईल अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडीच्या तीन फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०११४९ अनारक्षित विशेष ९ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत दर बुधवारी भिवंडी येथून २२:३० वाजता सुटेल आणि सांकराईल माल टर्मिनल यार्ड येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १:०० वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपुर, बिलासपुर, झारसुगुड़ा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खड़गपुर येथे थांबा राहणार आहे. १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे.

खड़गपुर – ठाणे अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडीच्या देखील तीन फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०११५० अनारक्षित विशेष १२ ते २६ एप्रिलपर्यंत दर शनिवारी खड़गपुर येथून २३.४५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचतील. या गाडीला टाटानगर, चक्रधरपुर, राउरकेला, झारसुगुड़ा, बिलासपुर, रायपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबा राहील.

१० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणीसह- गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे. अनारक्षित विशेष गाड्या आणि कोचसाठी तिकिटे सामान्य शुल्कात यूटीएसद्वारे बुक करता येतील. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता आटोपत आल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनस्थळी जाण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यामुळे या सुट्ट्यांच्या दिवसात रेल्वे गाड्यांमध्ये गर्दीचे प्रमाण प्रचंड असते. रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वीच फुल्ल होऊन जाते. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुविधेसाठी उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.