नागपूर : विदर्भात कोल कॉल वॉशरीज वाढत असून त्यात मोठा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. कोराडी-खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामुळे वायू प्रदूषण वाढले. नांदगाव- वारेगावला पुन्हा राखेची साठवणूक सुरू झाली. आता कोराडीत ६६० मेगावॅटचे दोन नवीन प्रकल्प आणून स्थानिकांचे जीवन आणखी धोक्यात टाकायचे आहे काय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. अजनी वन आणि नांदगाव- वारेगाव ॲश पाॅन्ड परिसरातील विविध उपक्रमात सहभाग घेण्यासाठी सोमवारी नागपुरात आले असता ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, विदर्भात कोल कॉल वॉशरीज वाढत असून त्यात मोठा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. मी पर्यावरण मंत्री असताना हे थांबवले होते. आमच्या सरकारने अजनी वनलाही स्थगिती दिली होती. परंतु आता मल्टिमाेडल स्थानकाच्या नावाने हे वनही संपवले जाईल. राज्यातील वेगवेगळ्या भागातील सहा औष्णिक विद्युत निर्मितीचे युनिट बंद करून कोराडीत ६६० मेगावॅटचे दोन नवीन प्रकल्प आणले जात आहेत. त्यामुळे राज्यातील बंद होत असलेल्या युनिट परिसरात रोजगाराचा प्रश्न उपस्थित होईल. तर आधीच प्रदूषणाने त्रस्त कोराडीत स्थानिकांचा त्रास वाढेल.

हेही वाचा – नागपूर : वीज पुरवठा आम्हाला, प्रदूषणाचा त्रास मात्र वैदर्भीयांना – आदित्य ठाकरे

खासगी कंपन्यांकडून वीज निर्मिती प्रकल्पात एफजीडी यंत्रणा व इतर सोय केली जाते. परंतु महानिर्मितीकडून प्रदूषण नियंत्रणासाठी काहीही केले नाही. कोराडीतही तेच दिसत असल्याचेही ठाकरे म्हणाले. जे नेते केंद्र सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी ईडी नोटीस पाठवते. जयंत पाटील यांच्याबाबतही तेच झाले. केंद्र व राज्यातील सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत असून त्यांच्या विरोधात आम्ही लढत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader