राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर महाविकासआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशातच आता विजय वडेट्टीवारांनी शरद पवार-अजित पवार भेटीवर मोठं वक्तव्य केलं आहे. ते बुधवारी (१६ ऑगस्ट) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार काका-पुतण्या आहेत. त्यामुळे या भेटीनंतर संभ्रम संभ्रम असं म्हणण्याचं काही कारण नाही. शरद पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील. काही काळ धीरही धरला पाहिजे. मी या भेटीने संभ्रम निर्माण झाला असं म्हणणार नाही. या भेटीत कुणाची तरी गरज आहे. ही गरज जो भेटायला जातो त्याचीच आहे.”
“अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर शरद पवारांना…”
“अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर शरद पवारांना सोबत घ्यावं लागेल. शरद पवार सोबत आले नाही, तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नच बघत रहावं लागेल, असं कदाचित भाजपाने म्हटले असेल. हा सत्तेसाठी सुरू असलेला खटाटोप आहे,” असं मत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : राज ठाकरेंकडून भाजपाची ऑफर आल्याचा दावा; अजित पवार म्हणाले, “असलं काही…”
“विचाराला तिलांजली, केवळ खुर्चीला महत्त्व”
“येथे विचाराला तिलांजली देण्यात आली आहे, विकासाला तिलांजली दिली आहे. येथे केवळ खुर्चीला महत्त्व दिलं आहे हेच या घडामोडींमधून दिसत आहे,” असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपा आणि अजित पवार गटावर सडकून टीका केली..