मंदिरालगतचे मोठे वृक्ष छतावर कोसळून भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पारसमध्ये नुकतीच घडली. नागपूर शहर व जिल्ह्यातही धार्मिक स्थळाच्या सभामंडपालगत किंवा इतर मोठ्या इमारतींना लागून मोठे वृक्ष आहेत. महापालिका प्रशासनाकडे अशा वृक्षाबाबत तक्रारी आल्या आहेत. प्रशासनाने गांभीर्य ओळखून पावले उचलली नाही तर पारससारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला जिल्ह्यात पारस येथे बाबूजी महाराज संस्थान या मंदिराला लागून असलेले सभामंडपावर मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने त्यात सात लोक मृत्युमुखी तर अनेक भाविक जखमी झाले. या घटनेनंतर जिल्ह्यासह शहरातील मंदिरांच्या सभामंडपालगत असलेली तसेच इतरही मोठ्या इमारतींच्या शेजारी असलेल्या मोठ्या वृक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्व नागपुरात जागनाथ बुधवारी परिसरात असलेल्या जागृतेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी होते. या मंदिराला लागून मोठे वृक्ष असून शेजारीच सभामंडप आहे. याशिवाय कल्याणेश्वर मंदिर, तेलंगखेडी मंदिर, पारडीचे भवानी मंदिर, आग्याराम देवी मंदिर इत्यादी मंदिराच्या सभामंडपाच्या शेजारी मोठे वृक्ष आहेत. नवरात्रोत्सव काळात आग्याराम देवी, पारडी येथील भवानी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याशिवाय सिरसपेठ येथील गुलाब बाबा आश्रम, राजाबाक्षा येथील हनुमान मंदिर, वाकी दरबार, टेकडी गणेश मंदिर परिसरातील टिनाचे सभामंडप असून परिसरात मोठे वृक्ष आहेत. अनेक नागरी वस्तीतही इमारतीला लागून मोठे वृक्ष आहेत. विशेषत: जुन्या नागपूरमध्ये बाजाराच्या किंवा वर्दळीच्या भागात या इमारती आहेत. नागपूरला वादळी पावसाचा इतिहास आहे. अनेकदा वादळात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनाही घडतात. पारसच्या घटनेपासून बोध घेत महापालिकेने उपाययोजना करण्याची आवश्यकता संबंधित भागातील नागरिक बोलून दाखवतात.

हेही वाचा >>>‘संभाजीनगर’चा धसका म्हणून नागपूरच्या सभेसाठी भाजपचे आकांडतांडव – माजी मंत्री अनिल देशमुख

बर्डीतील घटनेनंतरही बोध नाही

दोन महिन्यापूर्वी सीताबर्डीतील कीर्तन गल्लीमध्ये राहणाऱ्या सेन कुटुंबीयांच्या घरावर वादळामुळे शेजारचे लिंबाचे मोठे झाड कोसळले होते. त्यात घराचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने कुठलीही मनुष्यहानी झाली नाही. या वृक्षाबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. या घटनेनंतरही महापालिकेने याबाबत ना सर्वेक्षण केले ना कुठली उपाययोजना केली.

धार्मिक स्थळाला लागून किंवा इमारतीलगत मोठे वृक्ष असतील तर संबंधितांनी महापालिका प्रशासनाला कळवायला हवे. महापालिकेने याची दखल घेऊन वेळीच उपाययोजना करायला हवी.– अभिजित चंदेल, सिटीझन फोरम.

शहरातील मोठ्या वृक्षांची नियमितपणे छाटणी करण्यात येते. धार्मिक स्थळालगत मोठे वृक्ष असेल तर संबंधितांकडून तक्रार आल्यावर तत्काळ उपाययोजना केली जाते. महापालिका प्रशासन याबाबत दक्ष आहे.- अमोल चोरपगार, उद्यान अधीक्षक, महापालिका.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big trees near religious places residential buildings in nagpur vmb 67 amy
Show comments