पीटीआय, गोपालगंज (बिहार)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.राजदचा बालेकिल्ला असलेल्या गोपालगंजमधील रॅलीला संबोधित करताना शाह यांनी विरोधी पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांच्यावर १५ वर्षे एकत्र राज्य करत ‘जंगलराज’ चालवल्याचा आरोप केला. सत्तेत असताना राज्यात खून, अपहरण, दरोडे हे उद्याोग बनले होते, असा आरोप त्यांनी केला.
गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमधील भाजपचे प्रमुख रणनीतीकार मानले जाणारे शहा यांनी संबोधित केलेली ही पहिलीच जाहीर सभा होती. यावेळी शहा यांनी ८०० कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पशुसंवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकासालाही पुढे नेत आहेत, बिहार बदलण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे शहा म्हणाले. आज पुन्हा एकदा बिहारची जनता निवडणुकीला सामोरी जात आहे असे सांगत या वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा एनडीएचे सरकार बनवावे आणि मोदीजींचे हात बळकट करावेत, असे आवाहन शहा यांनी केले.
मोठे उद्याोगपती राज्यातून पळून गेले, त्यांच्या सुरक्षेची चिंता होती. लालूंनी चारा घोटाळ्यात सहभागी होऊन बिहारचे नाव जगभरात बदनाम केले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जदयूच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन केल्यावर परिस्थिती सुधारू लागली आहे. बिहारमधील पुराची समस्या भूतकाळात जमा झाली आहे.– अमित शहा, गृहमंत्री