चंद्रपूर : चार वर्षीय चिमुकल्याला दुचाकीवर घेऊन जात असलेल्या महिलेचा राजुरा-बल्लारपूर पुलावर अपघातात मृत्यू झाला. सुदैवाने चार वर्षांचा चिमुकला बचावला. मात्र, तो रात्रभर आईच्या मृतदेहाशेजारी रडत होता. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बामणी येथील आदित्य प्लाझा येथे राहणाऱ्या सुषमा पवन काकडे आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्यासाठी चॉकलेट आणायला दुचाकीने घराबाहेर पडल्या.
बामणीहून राजुरा येथे जात असताना दुचाकीवरून तोल गेल्याने त्यांचे वाहन वर्धा नदीच्या पुलावरून खाली कोसळले. यात मातेचा मृत्यू झाला, तर चिमुकला थोडक्यात बचावला. अपघातानंतर चिमुकला रात्रभर आईच्या मृतदेहाशेजारी रडत होता. गुरुवारी पहाटे पाच वाजता पुलाखालून मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी खाली डोकावून पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली. चिमुकल्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.