लोकसत्ता टीम

अमरावती : कुटुंबासह लग्नाला जात असलेल्या एका दुचाकीस्वार तरुणाचा चिनी मांजाने गळा चिरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी बडनेरा ठाण्याच्या पोलीस हद्दीतील अकोला-अमरावती मार्गावरील वरूडा येथील उड्डाणपुलावर घडली.

शुभम बिल्लेवार (३०) रा. अकोला असे मृताचे नाव आहे. शुभम हे शुक्रवारी दुपारी पत्नी, मुलगा व मुलीसह दुचाकीने अंजनगाव बारी येथे एका नातेवाईकाच्या लग्नाला जात होते. त्याच्या मागे त्यांचे नातेवाईकसुद्धा दुचाकीने येत होते. दरम्यान, वरूडा येथील उड्डाणपुलावर झाडाला अडकलेला मांजा अचानक दुचाकी चालवित असलेल्या शुभम यांच्या गळ्याला आवळला. त्यात त्यांचा गळा चिरल्या गेला. शुभम यांनी स्वत:ला सावरत दुचाकी थांबविली. त्यानंतर त्यांना पत्नी व नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, मांजाने गळा चिरून अतिरक्तस्त्राव झाल्याने शुभम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आणखी वाचा-नागपूर : स्फोटात सहा जणांचा कोळसा झालेल्या दारूगोळा कंपनीच्या मालकाला अखेर बेड्या, आता स्फोटामागची खरी माहिती…

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर बडनेराचे ठाणेदार पुनील कुलट यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. यापूर्वीसुद्धा शहरात चिनी मांजाने गळा चिरून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण या प्रतिबंधित मांजाने जखमी झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा चिनी मांजाच्या बंदीचा विषय समोर आला आहे.

तीन वर्षांपुर्वी दुचाकीने घरी परत जात असलेल्या युवतीचा चिनी मांजाने गळा चिरून मृत्यू झाल्याची घटना येथील पुंडलिकबाबा नगर परिसरात घडली होती. विद्या गवई ही २३ वर्षीय तरूणी रुग्णालयातील सेवा आटोपून दुचाकीने घरी जात असताना ही दुर्देवी घटना घडली होती. राष्ट्रीय हरित लवादाकडून चिनी नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. वेळोवेळी कारवाई करण्यात येत असली, तरी अजूनही चिनी मांजाची विक्री थांबलेली नाही. विक्रेते छुप्या पद्धतीने चिनी मांजाची विक्री करत असल्याचे आढळून आले आहे.

आणखी वाचा-नवीन शैक्षणिक वर्षात शाळांना कुठल्या सुट्ट्या राहणार माहिती आहे का? आताच बघा व सुट्ट्यांचे नियोजन करा

जिवाला धोका असणाऱ्या या नायलॉन (चिनी) मांजाच्या विक्रीवर बंदी असली, तरी तो बाजारातही सहजपणे उपलब्ध होतो. मोठी शहरे तसेच गावांत संक्रांतीच्या आधी नायलॉन मांजा पतंगविक्रेत्यांकडे उपलब्ध होतो. झोपडपट्ट्यांमधील दुकानांपासून उच्चभ्रू भागात नायलॉन मांजा सहज उपलब्ध होतो. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई करत असले, तरी, आतापर्यंत नायलॉन मांजा उत्पादकाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.