नागपूर : राज्यात अनेक विद्यार्थी इयत्ता अकरावीसाठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतात. महाविद्यालयाच्या वेळेत हे विद्यार्थी खासगी शिकवणी (कोचिंग क्लासेस) वर्गात हजर असतात. खासगी क्लास चालक आणि महाविद्यालय यांच्या संगनमताचे (टाय-अप) पेव फुटले असून त्यावर आळा बसला पाहिजे, हा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. यावर आता भक्कम उपाय शोधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळेत हजर न राहणारे विद्यार्थी बारावी परीक्षेलाही मुकू शकतात. खाजगी शिकवणी वर्गांशी साटेलाेटे करून तेथील विद्यार्थ्यांना नामधारी प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना यापुढे माेठ्या कारवाईस सामाेरे जावे लागण्याची शक्यता आहे.

यापुढे प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी विद्यालयांना घ्यावी लागेल. नियमित वेळापत्रकानुसार विद्यार्थी सातत्याने गैरहजर आढळल्यास अशा विद्यालयांची मान्यताच रद्द करण्याचा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक नरड यांनी आदेशात दिला आहे.

हेही वाचा : वर्धा : भल्यामोठ्या अजगरामुळे दहा गावांत अंधार…

विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी ८ जुलै राेजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. शहरातील व बाहेरील अनेक विद्यालयांचे खाजगी शिकवणी वर्गांशी साटेलाेटे असते व त्यामुळे या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना नामधारी प्रवेश दिले जात असल्याच्या माैखिक व लेखी तक्रारी प्राप्त हाेत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविना शाळा सुरू आढळल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा आदेशात देण्यात आला आहे. एवढेच नाही तर ज्या विद्यार्थ्यांची नियमित वेळापत्रकानुसार उपस्थिती आढळून आली नाही, त्यांना बाेर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही, अशीही ताकीद या आदेशात देण्यात आली आहे.

हेही वाचा : चंद्रपूर : ‘जलजीवन’ची कामे अपूर्ण, तब्बल ३२ कंत्राटदारांना…

काय आहेत सूचना

संच मान्यतेनुसार मान्य तुकड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेता येणार नाही. असे प्रवेश झाल्यास वाढीव प्रवेशांना मान्यता देण्यात येणार नाही. शासन निर्णय धाेरणानुसार विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीनेच घेण्यात यावी. नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ११ वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच हाेणे बंधनकारक आहे. ऑफलाईन प्रवेशास मान्यता देण्यात येणार नाही. अशा प्रवेशांची संचमान्यतेत नाेंद घेतली जाणार नाही.

ऑफलाईन प्रवेश घेतलेले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची राहिल. शाळेत मुलांमुलींचे स्वच्छता गृहे, पिण्याच्या पाण्याची, विद्यार्थी बैठक व्यवस्था, ग्रंथालय, प्रयाेगशाळा आदी व्यवस्था सुसज्जित असाव्या. वेळापत्रकानुसार शिक्षकांच्या नियमित तासिका असाव्या. प्रयाेगशाळेतील प्रात्याक्षिक नियमित वेळापत्रकानुसार घेण्यात यावे.

हेही वाचा : पुन्हा कंत्राटी भरती; वैद्याकीय महाविद्यालये, रुग्णालयांतील ६,८३० पदांना शासनाची मंजुरी

शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमित भेटी द्याव्या

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी महिन्यातून किमान २ कनिष्ठ महाविद्यालय/ उच्च माध्यमिक विद्यालयांना भेटी द्याव्या. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी महिन्यातून किमान ३ विद्यालयांना भेटी द्याव्या. हजेरी पटावरील विद्यार्थी उपस्थिती आहेत की नाही, वेळापत्रकानुसार विषयनिहाय वर्ग सुरू आहेत की नाही, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची उपस्थिती व मूलभूत साेयी सुविधांची तपासणी करावी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biometric attendance compulsory for students not attending schools due to private coaching classes dag 87 css
Show comments