नागपूर : उपराजधानीतील राज्य शासनाच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूचे संक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथील व जवळपासच्या सुमारे साडेआठ हजार कोंबड्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या केंद्रातील ‘कुक्कुट पालन केंद्रात’ बर्ड फ्लूचा उद्रेक झाला. गेल्या काही दिवसांत रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवले. चार मार्चला आलेल्या अहवालात या कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ म्हणजे एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – गडचिरोली-चिमूर लोकसभेचा तिढा वाढला; संघपरिवाराकडून नव्या नावाच्या आग्रहाने महायुतीपुढे पेच!

प्रशासनाने नियमानुसार संबंधित कुक्कुटपालन केंद्राचा एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानंतर पाच मार्चच्या रात्री संबंधित कुक्कुटपालन केंद्रातील ८ हजार ५०१ कोंबड्यांना मारण्याची प्रक्रिया केली गेली. सोबतच केंद्रातील १६ हजारांहून जास्त अंडीही नष्ट केली गेली. नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजूषा पुंडलिक यांनी बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे मान्य केले. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पुंडलिक म्हणाल्या, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये संक्रमण आढळल्यावर नियमानुसार कोंबड्या आणि अंडी नष्ट केली. प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतर कुठल्याही कुक्कुटपालन केंद्रावर सध्या संक्रमण झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

पशुवैद्यकीय विद्यापीठातील केंद्रातही संक्रमण

राज्य शासनाच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राच्या एक किमी परिसरात पशुवैद्यकीय विद्यापीठाचेही कुक्कुटपालन केंद्र असून तिथल्याही २६० कोंबड्यांना मारण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा – एसटी महामंडळाकडून माहिती अधिकारात माहिती हवी, तर २,३४९ रुपये मोजा!

कुक्कुट खरेदी, वाहतुकीस २१ दिवस प्रतिबंध

नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांचे मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निदान झाल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कुक्कुट शेड निर्जंतुकीकरणासह बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी खाद्य खरेदी, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील २१ दिवसांपर्यंत प्रतिबंधही लागू केले आहेत. केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार जिल्हात शिघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत ८ हजार ५०१ पक्षी व १६ हजार ७७४ अंडी तसेच ५ हजार ४०० किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird flu in thousands of chickens in nagpur order to kill eight and a half thousand chickens mnb 82 ssb